मुंबई – आयपीएल स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्स संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे बुधवारी पंजाबविरुद्ध पुण्यात होणारा सामना आता मुंबईतच ब्रेबॉन स्टेडियमवर हलवण्यात आला आहे. दिल्लीचा मिशेल मार्श आरटीपीसीआर चाचणीत बाधित आढळल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच दिल्ली संघातील मार्शसह करोनाची बाधा झालेल्या सपोर्ट स्टाफमधील अन्य चार सदस्यांनाही विलगीकरणात पाठवण्यात आले आहे.
करोनाची बाधा झालेल्यांची संख्या आता पाच झाली आहे. दिल्लीच्या खेळाडूंनी प्रवास करणे योग्य नसल्याचे स्पष्ट करत त्यांचा पंजाबशी होणार सामना आता पुण्यातील गहुंजेतील एमसीए स्टेडियमऐवजी मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर होणार आहे, असे बीसीसीआयने जाहिर केले आहे.
सोमवारी दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू मिचेल मार्शला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यापूर्वी दिल्ली संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट हे बाधित झाल्यामुळे त्यांना विलगीकरणात ठेवले गेले आहे. त्यांच्याशी संपर्क आलेल्या डॉ. अभिजित साळवी, स्पोर्टस मसाज थेरपिस्ट चेतन कुमार, सोशल मीडिया कंटेन्ट सदस्य आकाश माने या सर्वांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. दिल्लीचा संघ मुंबईत असून मंगळवारी पुण्यात दाखल होणार होता. मात्र कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या पाहता खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना हॉटेलमधील त्यांच्या खोलीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
फिजीओला बाधा झाल्याने वाढली होती चिंता
15 एप्रिल रोजी दिल्ली संघाचे फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फरहार्ट यांना करोनाची बाधा झाल्याचे आढळले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मसाज थेरपिस्ट चेतन कुमारचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. लगेचच दिल्ली संघातील खेळाडू मिशेल मार्शलाही बाधा जाल्याचे उघड झाले. तसेच सपोर्ट स्टाफमधील सदस्य डॉ. अभिजित साळवी आणि सोशल मीडिया मॅनेजर आकाश माने यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले.
त्यामुळे केवळ दिल्लीच्याच संघाला नव्हे तर संपूर्ण स्पर्धेलाही धोका निर्माण झाला आहे. आता दिल्ली संघातील खेळाडूंची सातत्याने चाचमी केली जाणार असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तरत त्यांचे सामने खेळवले जाणार असून अन्यथा अन्य पर्यायांचा विचार केला जाणार आहे, असे बीसीसीआयने कळवले आहे.