नवी दिल्ली : दिल्लीतील इस्रायलच्या दूतावासाजवळ (israel embassy) एक स्फोट (Blast) झाला होता. या स्फोटाचं गांभीर्य लक्षात घेवून इस्त्रायलची जगप्रसिद्ध गुप्तचर संस्था मोसादही या प्रकरणाचा तपास करणार आहे. या प्रकरणी महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती लागल्याचे समजते.
भारतीय तपास यंत्रणा आयबीने (IB) तपास सुरू केला आहे. या स्फोटाच्या तपासासाठी आयबी आणि एनआयए (NIA) या दोन तपास यंत्रणा मैदानात आहेत. दिल्ली पोलीसही मदतीला आहे. आता यामध्ये आणखी एका तपास यंत्रणेची भर पडली आहे. इस्त्रायलची (israel) मोसादही (Mossad) या प्रकरणाचा तपास करणार आहे.
शुक्रवारी सायंकाळी 5 च्या सुमारास दिल्लीतील इस्रायल दूतावासाजवळ हा स्फोट झाला आहे. या स्फोटाचं आता इराण कनेक्शन समोर आलं आहे. तपासादरम्यान घटनास्थळावरून पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीच्या माध्यमातून यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता आंतराष्ट्रीय स्वरूप आले आहे. संबंधित आरोपींना पकडण्यासाठी आता तातडीची पावलं उचलली जात आहेत.
गुन्हे शाखेला संशय आहे की, हल्लेखोरांनी ऑनलाइन कॅब बुकिंगच्या माध्यमातून हा धमाका घडवून आणला आहे. त्यामुळे अब्दुल कलाम रोडवर घटनास्थळापासून ते 3 किमी पर्यंत किती लोकांनी कॅब बूक केली होती. याची माहिती घेतली जात आहे. त्यासाठी ओला आणि उबरला संपर्क साधण्यात येत आहे. या स्फोटानंतर पोलिसांकडून आता इराणी नागरिकांची माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे. या तपासादरम्यान दोन संशयित व्यक्ती कॅबमधून उतरून संशयास्पदरित्या फिरताना दिसले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणी कॅब चालकांचीही चौकशी करण्यात येत आहे.