नवी दिल्ली – जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारतात लागू असलेला “ऍफ्स्पा’ कायदा हटवण्याबाबत आढावा घेतला जाईल, या कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी जोरदार टीका केली आहे. या आश्वासनांनी कॉंग्रेस पार्टी सुरक्षा दलांना कमकुवत करत आहे, असे सितारामन म्हणाल्या. कॉंग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलेल्या सर्व आश्वासनांचा दहशतवाद्यांशी निकटचे संबंध असलेल्यांकडून गैरफायदा घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सुरक्षा दलांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न योग्य आहे का? सुरक्षा दलांची प्रतिकारशक्तीच अशामुळे काढून घेतली जाईल. कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यामध्ये देशविरोधी शक्तींचेच प्रतिबिंब असल्याचे दिसत आहे, असेही सितारामन म्हणाल्या.
जम्मू काश्मीरमधून “ऍफ्स्पा’ कायदा हटवल्याने लष्कराचे नैतिक खच्चीकरण होईल. कॉंग्रेसच्या या घोषणेमुळे राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करण्यात आल्याची टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही काल केली होती.