बारामती न्यायालयाचा निर्णय : 26 मे 2018मध्ये वाघळवाडी येथे घडली होती घटना
बारामती -अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर अत्याचार केल्याच्या खटल्यात संदीप उर्फ संभाजी पोपट शेंडकर (रा. शेंडकरवाडी, ता. बारामती) याला बुधवारी (दि. 12) बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. लोखंडे यांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. 26 मे 2018 रोजी ही घटना घडली होती. घटनेनंतर परराज्यात पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या शेंडकर याला दौंड तालुक्यातील केडगाव रेल्वे स्थानकावर पोलिसांनी पकडले होते.
या खटल्याची हकिकत अशी, वाघळवाडीच्या कन्नडवस्ती येते राहणाऱ्या एका शेतमजूराची 11 वर्षीय मुलगी वाणेवाडी चौकामध्ये कानातील रिंग घेण्यासाठी गेली होती. दुचाकीवरून आलेल्या आरोपीने तिला कालव्याच्या बाजूला नेत तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. तिला पुन्हा दुचाकीवर बसवत पुलाजवळ आणून सोडले होते. हे शेतमजूर कुटुंब कामावरून घरी आल्यानंतर पीडितेच्या आईला मुलगी घरी दिसली नाही, त्यामुळे तिने आजूबाजूला तिचा शोध घेतला.
मुलगी गायब झाल्याने सोमेश्वरनगर परिसरात खळबळ उडाली होती. परिसरातील दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेत पोलिसांनी लागलीच तिच्या तपासासाठी चक्रे फिरवली. रात्री अकराच्या सुमारास मुलीला सोडताना कन्नडवस्तीवरील दोघांना त्याला पाहिले होते. त्यांनी त्याला हटकण्याचा प्रयत्न करताच त्याने दुचाकी सुरु करत धूम ठोकली होती. त्यावरून आरोपी निष्पन्न झाला होता.
घटनेनंतर शेंडकर हा परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत होता. परंतु पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत मोबाइल लोकेशनच्या आधारे त्याचा शोध घेतला. तो केडगाव रेल्वे स्थानकावर असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, विठ्ठल कदम, सचिन वाघ व अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले होते. पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध अपहरण, बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
न्यायाधीश आर. व्ही. लोखंडे यांच्यासमोर हा खटला चालला. त्यात सरकार पक्षातर्फे ऍड. अरुंधती रासकर यांनी काम पाहिले. त्यांनी केलेला युक्तिवाद व उपलब्ध साक्षी पुराव्याच्या आधारे न्यायाधीश लोखंडे यांनी शेंडकर याला आजन्म कारावास व 55 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाला वडगावचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, हवालदार एन. ए. नलवडे यांचे सहकार्य मिळाले.