सातारा -शिरवळ येथील “एके’ गॅंगला मोका कायद्याचा दणका देण्यात आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. टोळीप्रमुख अतिश उर्फ बाबू राजेंद्र कांबळे (वय 21, रा. बौद्ध वस्ती शिरवळ), विशाल शेखर वाडेकर (वय 20, रा. कांबळे आळी, शिरवळ), रामा दादा मंडलिक (वय 21, रा. साठे कॉलनी, शिरवळ), संजय विजय कोळी (रा. संभाजी चौक खंडाळा) यांच्यावर मोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अन्वये प्रभावी कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला होता.
संबंधित टोळीने शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पैसे उसने देण्याच्या कारणावरून पायी चालत जाणाऱ्या फिर्यादीला लोखंडी हत्याराने मारहाण करून जबर जखमी केले होते. या गुन्ह्याची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली होती. गंभीर दुखापत करून जबरी चोरी, जबरी चोरीचा प्रयत्न, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल झाले होते.
त्याप्रमाणे या टोळीच्या सदस्यांवर संघटित गुन्हेगार नियंत्रण अधिनियमानुसार पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. फुलारी यांनी मोका कायद्यानुसार दाखल प्रस्तावाची पडताळणी करून टोळीवर कलम लागू करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. पुढील तपास उपअधीक्षक राहुल धस यांच्या माध्यमातून सुरू आहे.
मोका प्रस्ताव मंजुरीसाठी पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर, फलटणचे उपअधीक्षक राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण देवकर, शिरवळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक नवनाथ मदने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश अंदेलवार, जितेंद्र शिंदे, मंगेश मोझर यांनी सहभाग घेतला.