नगर – महापालिकेतील मानधन तत्वावरील अभियंते व कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी एका कर्मचाऱ्यामार्फत 5 ते 10 लाख रुपये गोळा केले जात असून महापालिकेमध्ये कायम करण्याचा ठराव करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील,असे सांगून हे पैसे गोळा केले जात असल्याची गंभीर तक्रार महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी आमदार संग्राम जगताप यांना निवेदनाद्वारे केली.
यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडेही तक्रार करणार असून संबंधितावर कारवाईची मागणी करणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले. निवेदन आ. जगताप यांना देण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही गंभीर तक्रार केली. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, संघटनेचे पदाधिकारी आनंद वायकर, बाबासाहेब मुदगल, सतीश ताठे, परिमल निकम, विकास गीते, बलराज गायकवाड, गुलाब गाडे, महादेव कोतकर, बाबासाहेब राशिनकर, विठ्ठल उमाप, राहुल साबळे, अमोल लहारे, अजित तारू आदी उपस्थित होते.
संघटनेच्या वतीने 2 ऑक्टोबरला नगर ते मंत्रालय मुंबई असा पायी ‘लॉंगमार्च’ काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रात ड वर्ग महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. इतर मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही तेथे कर्मचाऱ्यांना तो लागू करण्यात आला. मात्र नगर मनपाला कर्मचाऱ्यांना तो लागू झालेला नाही. त्यामुळे सातवा वेतन आयोग लागू करावा, सफाई कर्मचाऱ्यांना वारसांना नोकरी हक्क मिळावा, या मागणीचे निवेदन संघटनेने आ. जगताप यांना दिले. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अधिकारी, पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलवण्यासाठी प्रयत्न करण्याचे तसेच या मागण्यांसाठी शासन दरबारीही प्रयत्न करण्याचे आश्वासन आ. जगताप यांनी दिले.