मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या दोन्ही पूत्रांवर शरद पवार यांच्यावर बदनामीकारक आरोप केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीतेश आणि नीलेश राणे यांनी शरद पवार हेच दाऊदचा माणूस असल्याचा संशय येतोय अशा आशायाचे वक्तव्य केले होते. त्यावरून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी शरद पवारांचा संबंध दाऊद इब्राहिमशी जोडल्याप्रकरणी राण बंधूंविरोधात आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
निलेश राणे यांनी शरद पवारांचा संबंध थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडला होता. शनिवारी केलेल्या वक्तव्यात ते म्हणाले होते, मला संशय येतो की शरद पवारच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस आहेत. खरंच संशय येतो. ज्यांनी व्यवहार केला, दाऊदच्या बहिणीला पैसे दिले, दाऊदच्या माणसांना पैसे दिले, बॉम्बब्लास्ट करणाऱ्या माणसांना पैसे दिले.
अनिल देशमुखांनी काय केलं होतं? कसा झट की पट राजीनामा घेतला होता. विचार केला होता का? मग नवाब मलिक कोण आहे? ज्यांनी दाऊदशी व्यवहार केला. की अशी भीती आहे की नवाब मलिक खरं बोलले, तर शरद पवारांविषयी माहिती बाहेर येईल? असं काही आहे का?