नवी दिल्ली – आपला कोणत्याही कट्टरपंथी संघटनेशी संबंध नाही. मात्र, तोडफोड करण्याचे समर्थन करणाऱ्या विचारधारेवर आपला विश्वास आहे, असे लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दीप सिध्दूने म्हटले आहे. तसेच केवळ भावनेच्या भरात आपण शेतकरी आंदोलनात सामील झाल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.
सरकारशी चर्चा करताना आणि ट्रॅक्टर रॅलीवेळी शेतकरी नेते नरमाईचे धोरण घेत होते, असा माझा संशय होता. लॉकडाऊनच्या काळात माझ्याकडे काहीच काम नव्हते. त्याचवेळी ऑगस्टपासून पंजाबात शेतकरी आंदोलन सुरू झाले आणि मी त्याकडे आकर्षित झालो, असेही तो म्हणाला.
यावेळी त्याने लाल किल्ल्यात पोहोचण्याचा प्लान कसा तयार केला, याची माहितीच पोलिसांना दिली. शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळी गेल्यावर तिथे त्याला तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर दिसला. प्रजासत्ताक दिनाच्या ट्रॅक्टर रॅलीवेळी निर्धारित मार्गावरून न जाण्याचा त्याने निर्णय घेतला. त्यामुळे त्याने स्वयंसेवकांचे जॅकेट चोरण्यासही त्याच्या सहकाऱ्यांना सांगितले.
लाल किल्ल्यावर जातानाच शक्य झाल्यास इंडिया गेटवरही जाण्याचा आमचा प्लॅन होता. लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवण्यासाठी जुगराज सिंगला खास बोलावण्यात आले होते, असा गौप्यस्फोटही त्याने केला.
सुखविंदर सिंग हा सुद्धा या आंदोलनात सरहभागी होता. तो लाल किल्ल्याच्या लाहौरी गेटवर दिसला होता. 2 फेब्रुवारी रोजी गाझीपूर बॉर्डरवर त्याने राकेश टिकैत यांची भेटही घेतली होती. तसेच 6 फेब्रुवारी रोजी चक्का जाम आंदोलनातही सहभागी झाला होता. त्याला चंदीगड येथून अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील दुसरा आरोपी लक्खा सिधाना याचाही पोलीस शोध घेत आहे. लक्खा सिधाना सातत्याने लोकेशन बदलत असल्याने त्याला पकडणे अवघड झाले आहे. तसेच लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणाऱ्या जुगराजची लोकेशन कुंडली येथे दाखवली जात आहे. तो पाच दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये आल्याचे दिसून आले होते. आता त्याचे लोकेशन सिंधु बॉर्डर दाखवली जात आहे.