सातारा – अंधाराला दूर सारत जीवनात प्रकाश घेऊन येणाऱ्या दिवाळी सणासाठी विविध प्रकारच्या आकाशकंदीलांनी सातारा शहराची बाजारपेठ सजली आहे. यावर्षी पारंपरिक आकाशकंदीलांसोबत इको फ्रेंडली आकाशकंदील बाजारात दाखल झाले आहेत. साताऱ्यात कागदी कार्डबोर्ड, जाड पेपर, कापड, प्लायवूड यामध्ये विविध आकारांमध्ये आकाशकंदील आकर्षक स्वरूपात उपलब्ध झाले असून त्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे.
दिवाळीमध्ये सर्वाधिक मागणी असते ती आकाशकंदीलांना. सातारा शहरातील राजवाडा, मोती चौक, देवी चौक, मारवाडी चौक, समर्थ मंदिर इत्यादी परिसरामध्ये आकाशकंदीलांनी वेगवेगळ्या दुकानांना दिवाळीचा साज चढवला आहे. आज वसुबारस असल्यामुळे बाजारपेठेत वेगवेगळ्या आकर्षक रंगांनी उजळलेले मनोहारी आकाशकंदील मनाचा ठाव घेत आहेत. सातारकरांचा खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शनिवारी धनत्रयोदशी आणि सोमवारी नरकचतुर्दशी असल्यामुळे सातारकरांनी दीपोत्सवाच्या स्वागतात कोठे कसूर ठेवली नाही. त्यामुळे आकाशकंदीलांच्या खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
पूर्वी बांबूंच्या कामट्यांपासून आकाश कंदील बनवले जायचे. मात्र, यामध्ये काळानुरूप बदल झाला असून मागील दहा वर्षात प्लॅस्टिकचे आकाशकंदील बाजारात आले. हे आकाशकंदील अनेक वर्षे टिकत असल्याने त्यांना मागणीही वाढली होती. सध्या सर्वच प्रकारांमध्ये इको फ्रेंडलीचे वारे वाहत आहेत. प्लॅस्टिकचे नुकसान लक्षात आल्याने नागरिकांनी इको फ्रेंडली आकाश कंदिलांची मागणी केली आहे. जाड कार्डशिटचे टिकाऊ आकाश कंदील आपली जागा राखून आहेत. मागील दोन वर्षात करोनाच्या संकटामुळे साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली होती. यावर्षी मात्र दिवाळीचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे.
पारंपरिक आकाश कंदील दुकानात दोनशे रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शोभेचे लहान आकाशकंदील 80 रुपयांपासून ते अगदी पाचशे रुपयेपर्यंत उपलब्ध आहेत. राजवाडा परिसरात गोल बागेजवळ विक्रेत्यांनी आपली पथारी मांडून आकाश कंदीलाची मनोहारी रास रचली आहे. रस्त्यावर झळाळणारे आकाश कंदील सातारकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.