निर्देशांकात घट! रुपया घसरला; फेडरल रिझर्व्हच्या व्याज दरवाढीच्या संकेताचा परिणाम

मुंबई – अमेरिकेची रिझर्व्ह बॅंक असलेल्या फेडरल रिझर्व्हने महागाई वाढत असल्यामुळे व्याजदर वाढ लवकरच सुरू करणार असल्याचे संकेत आपल्या पतधोरणात दिले आहेत. यामुळे डॉलर वधारत असून अमेरिकेसह जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होऊन निर्देशांकात घट झाली. रुपयाच्या मूल्यात ही मोठी घट झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही.

बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 76 अंकांनी कमी होऊ होऊन 15, 691 अंकावर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 178 अंकांनी कमी होऊन 52,323 अंकांवर बंद झाला.

रुपयाचा भाव आज 76 पैशाने कोसळून 74.08 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. बॅंकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील कंपन्यांनी आज सपाटून मार खाल्ला. तर रुपया कमकुवत होत असल्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यात तेजीत होत्या. इंडसइंड बॅंक, मारुती,ऍक्‍सिस बॅंक, भारती एअरटेल, एचडीएफसी या कंपन्या पिछाडीवर होत्या. तर अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्‌स, टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा या कंपन्या आघाडीवर होत्या.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने यावर्षी विकास दर सात टक्के इतका होईल असे सांगितले आहे. त्याचबरोबर 2024 ऐवजी 2023 पासून व्याजदरात वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था सुरळीत होण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर भारताच्या दृष्टीकोनातून आणखी एक चिंतेचा विषय म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था सुरळीत होत असल्यामुळे क्रुडचे दर वाढत आहेत. आता क्रुडचे दर 74.40 प्रती पिंपावर गेले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.