…तरीही व्याजदर वाढणार नाहीत; स्टेट बॅंकेच्या अभ्यास अहवालातील निष्कर्ष

मुंबई – घाऊक महागाईबरोबर किरकोळ महागाई रिझर्व बॅंकेने ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा कितीतरी जास्त झाली आहे. मात्र तरीही आगामी पतधोरणात रिझर्व बॅंक व्याजदर सध्या तरी जैसे थे पातळीवर ठेवण्याची शक्‍यता आहे, असे स्टेट बॅंकेच्या अभ्यास अहवालात म्हटले आहे.

मे महिन्यात महागाई वाढली आहे. आगामी काळातही ती काही प्रमाणात वाढण्याची शक्‍यता आहे. क्रूडचे दर वाढत असल्यामुळे भारतातील महागाई त्या प्रमाणात वाढू शकते. जागतिक पातळीवर विविध देशांच्या रिझर्व बॅंकांनी गेल्या एक वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल सुलभता निर्माण केली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवरही महागाई वाढण्याचे संकेत आहेत.

असे असले तरी सध्याच्या परिस्थितीत विकास दर वाढण्याला रिझर्व बॅंक महत्त्व देण्याची शक्‍यता आहे, असे या अहवालात म्हटले आहे. रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहे. 4 जून रोजी जाहीर केलेल्या पत धोरणामध्ये रिझर्व बॅंकेला महागाई वाढण्याचा अंदाज आला होता.

तरीही रिझर्व बॅंकेने रेपो आणि रिव्हर्स रेपो दर सध्याच्या पातळीवर कायम ठेवले आहेत. महागाई वाढली तरी काही काळ त्याकडे दुर्लक्ष करून भांडवल सुलभता निर्माण करण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बॅंक करण्याची शक्‍यता आहे.

केंद्र सरकारनेही बऱ्याच प्रमाणात कर्ज घेऊन पायाभूत सुविधा वरील खर्च वाढविण्याचे ठरवले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. करोनाच्या पहिल्या लाटेबरोबरच दुसऱ्या लाटेवेळी देशातील वाहतुकीवर परिणाम झालेला आहे.

त्यातच इंधनाचे दर जास्त असल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढलेला आहे. त्याचा परिणाम महागाई वाढण्यावर होण्याची शक्‍यता रिझर्व बॅंकेला माहित आहे. मात्र अशा परिस्थितीतही विकास दर वाढावा यासाठी रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकारचे प्रयत्न चालू आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.