फसवा निसर्ग

अलीकडे ऐन दिवाळी आणि आसपासच्या काळात धुव्वाधार पाऊस पडला. काही दिवस पडतच राहिला. काय चाललंय काय हे? कुठला खेळ खेळतोय निसर्ग? असे प्रश्न सर्वांच्या मनात नक्कीच उमटले असतील. सर्व प्रकारची पटणारी आणि न पटणारी स्पष्टीकरणं दिली गेली-कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा, अरबी समुद्रातलं चक्री वादळ वगैरे वगैरे. पण निसर्गाच्या अजब खेळाचं खरंखुरं स्पष्टीकरण मिळणं दुरापास्तच आहे.

मला वाटतं खरोखरीच निसर्ग जसा नियमित आहे-म्हणजे दिवस रात्र, ऋतू इ. निसर्गचक्रं-तितका जरी नसला तरी काहीसा अनियमित आणि अनिश्‍चित जरूर आहे. कदाचित आपण निसर्गावर केलेल्या अधिक्रमणामुळे ही अनियमितता आली असेल. पूर्वी निसर्ग फसवा वाटण्याइतका अनिश्‍चित आणि अनियमित नव्हता. मधूनच तो आपली चुणूक दाखवायचा. त्यामुळे तो काही वर्षांपूर्वी खट्याळ होता असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

निसर्गाच्या चमत्कारिक खेळाकडे पाहून मला अशाच काही अनुभवांचं स्मरण झालं. मी शाळेत असताना एकदा भयानक जोरदार पाऊस झाला. कानठळ्या बसवणारा आवाज करीत विद्युल्लता आपलं तेज:पुंज अस्तित्व अधूनमधून दाखवीत होती. अकस्मात ती शाळेच्या इमारतीवर कोसळलीही. मात्र फारसं नुकसान झालं नाही. तासाभरातच पावसाचं रौद्ररूप नाहीसं झालं. शाळा सुटताच वातावरण पूर्णपणे निवळलंसुद्धा. 1961च्या पानशेत महापुराची आठवणही अजून ताजी आहे. आधी काही दिवस जोरदार पाऊस झाला होता. तो दिवस बुधवार, 12 जुलै होता. पुराची बातमी येताच शाळा लगेचच सोडून देण्यात आली. माझं घर लक्ष्मी रोडवर असल्यानं मी घरी आल्यावर चालतच पूर पाहण्यासाठी लकडी पुलाच्या दिशेनं जाऊ लागलो. विजय टॉकीजच्या चौकातच पाणी आलेलं होतं आणि वेगानं चढत होतं.

रस्त्याच्या दुतर्फा लोक भिंतीवर चढून बसले होते इतकी त्यांना पुराची दहशत बसली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत पाणी आमच्या घराजवळ-उंबऱ्या गणपती चौकापर्यंत-आलं. नंतर मात्र ते हळूहळू ओसरू लागलं. पुढचे महिना-दोन महिने जे दृश्‍य मला दिसत होतं ते पुराच्या दृश्‍यापेक्षाही भयानक होतं. सर्वत्र पडझड, लहानसहान घरं जमीनदोस्त झालेली, दुकानातील माल सडून दुर्गंधी पसरलेली. काही दिवस वीज आणि पाणी या सोयी उपलब्ध नव्हत्या. का कुणास ठाऊक पण पुराच्या आधी काही दिवस पालिकेनं अनेक वाड्यांतील विहिरी बुजवायची सूचना दिली होती. आमच्या वाड्यातील विहीर मात्र आम्ही बुजवली नव्हती. त्यामुळे पुरानंतर आमच्या विहिरीतून पाणी घेण्यासाठी झुंबड उडालेली मला चांगली आठवते.

2012 साली मी अमेरिकेत कामासाठी आयोवा राज्यातील सेडार फॉल्स या गावात राहत होतो. काम संपल्यावर मी आणि माझा सहकारी भारतात परत जाण्यासाठी निघणार होतो. डिसेंबर महिना होता आणि हिवाळ्याची चाहूल लागली होती. येता-जाता गार वाऱ्याचा बोचरा अनुभव येत होता. परंतु बर्फ पडण्याची अजिबात चिन्हं दिसत नव्हती. आमचं विमान-उड्डाण जवळच्याच सेडार रॅपिड्‌स या गावाहून शिकागोला आणि तिथून मुंबई असं अगोदरपासूनच आरक्षित केलेलं होतं. सेडार फॉल्सहून सेडार रॅपिड्‌स हा तासा-दीड तासाचा प्रवास आम्ही टॅक्‍सीनं करणार होतो.

निघण्याच्या अगोदर दोन दिवस स्थानिक टीव्हीवर नेमक्‍या आमच्या उड्डाणाच्या दिवशी जबरदस्त बर्फवृष्टी होणार असा अंदाज वर्तवण्यात आला. याचा अर्थ आम्ही त्या दिवशी थेट टॅक्‍सीनं जाणं अवघड दिसत होतं कारण रस्ता सुमारे दीड फूट बर्फानं आवृत होणार होता. त्यामुळे आम्ही आदल्या दिवशीच सेडार रॅपिड्‌सला गेलो. कुठंही बर्फाचा मागमूसही नव्हता. हवामानखात्याचे अंदाज असेच असतात असं म्हणून आम्ही सेडार रॅपिड्‌स विमानतळाच्या शेजारच्या हॉटेलात मुक्काम ठोकला. इतकंच काय खोलीच्या खिडकीतून पाहिल्यावर हिरवं गार गवत आणि स्वच्छ रस्ता दिसत होता. जेवून झोपलो. सकाळी उठून त्याच खिडकीतून पाहतो तो काय-सगळी जमीन, रस्ते आणि इमारतींवरही खरोखरीच फूट-दीड फूट पांढरा सफेद बर्फच बर्फ दिसत होता. निसर्गानं आपली अजब किमया दाखवली होती. आमचं उड्डाण अर्थातच रद्द झालं आणि पुढं भारतात परत येण्यासाठी बरीच यातायात करावी लागली.

अशीच गंमत 2016 मध्ये अमेरिकेतच मला अनुभवायला मिळाली. आम्ही 4 जण संपूर्ण अमेरिका पालथा घालण्याच्या उद्देशानं फिरत होतो. वायोमिंग राज्यामधील इंडिपेंडन्स रॉक या ठिकाणी थांबलो होतो तेव्हा वातावरणात किंचित गारवा जाणवायला सुरुवात झाली होती. नाहीतर त्याआधी चक्क उकाडाच होता. साधारणपणे दुपारचे साडेतीन वाजले होते. बसने आम्ही पुढं निघालो आणि पाच वाजण्याच्या सुमारास आकाशात काळेकुट्ट ढग जमा होऊन पाऊस पडायला लागला. त्यानंतर अचानक गारवा वाढला आणि पावसाचं पाणी खाली पडता-पडता त्याचं चक्क बर्फ होऊ लागलं.

बसच्या विंडस्क्रीनवर (पुढची काच) अगदी दुसरी काच बसवल्यासारखा बर्फाचा पापुद्रा तयार झाला आणि वायपर्समुळे तो कसाबसा तुटून खाली पडत होता. असा चमत्कार मी पूर्वी कधीही पाहिला नव्हता. पुढे आम्ही जवळच्याच यूटा ऑलिंपिक पार्क इथल्या जो क्विनी विंटर स्पोर्टस्‌ सेंटरला गेलो. या ठिकाणी 2002च्या विंटर ऑलिंपिक स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. तिथे उतरताच पावसाचं पाणी साचून तिथल्या पुतळ्यांवर बर्फ जमा झालेलं आम्ही पाहिलं! खरोखर निसर्गाचा आविष्कार अद्भुतच आहे. मात्र मानवानं जर आपले व्यवहार निसर्गावर अधिक्रमण न करता चालू ठेवले तर मला वाटतं निसर्गाची रौद्रता आज आपण अनुभवत आहोत त्यापेक्षा काही प्रमाणात कमी होईल.

श्रीनिवास शारंगपाणी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here