आंबेगावच्या काजलची सुवर्णपदकाला गवसणी

पारगाव शिंगवे – भारतीय महिला खो-खो संघात समावेश असलेल्या काजल तुकाराम भोर हिने अंतिम सामन्यात यजमान नेपाळ संघाचे तब्बल पाच खेळाडू अचूक टिपल्याने भारताचा विजय सुकर झाला आहे. महाराष्ट्रासाठी 14 सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या काजलने आपल्या भारत देशासाठी सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.आंतराष्ट्रीय मैदान गाजवल्याने देशातील सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

काठमांडू (नेपाळ) येथे दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत खो-खो मध्ये भारतीय पुरूष संघापाठोपाठ महिला संघानेही सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारतीय महिला संघाने खो-खोच्या अंतिम सामन्यात यजमान नेपाळचा 17-05 असा 1 डाव 12 गुणांनी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारतीय महिला संघाकडून आक्रमणात काजल भोरने 5 खेळाडूंना बाद करत भारताचा विजय सुकर केला आहे.

रांजणी येथील नरसिंह क्रिडा मंडळातील काजल तुकाराम भोर या ग्रामीण भागातील खेळाडुच्या यशाचे कौतुक होत आहे.काजल भोर या खेळाडूला खो-खो प्रशिक्षक संदीप चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले तिने जवळपास महाराष्ट्र संघाला 14 सुवर्णपदक मिळवून दिले आहेत. महाराष्ट्र महिला संघाचे कर्णधारपदही भुषवले आहे. खेलो-इंडीयाच्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतही तिने सुवर्णपदक मिळवले आहे.

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत या वर्षीचा देशपातळीवरील प्रतिष्ठेचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार तिने मिळवला आहे. मिळालेल्या या यशाबद्दल भारतीय खो-खो महासंघाचे सचिव एम.एस.त्यागी, सहसचिव चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सचिव संदीप तावडे यांच्यासह विविध स्तरातून काजलचे अभिनंदन होत आहे.

अनेक सुवर्णपदक पटकावण्याचा मानस
खो-खो खेळातून महाराष्ट्रासाठी 14 सुवर्णपदक मिळवुन दिली त्यानंतर आपल्या भारतीय संघात स्थान पटकावुन देशासाठी सुवर्ण कामगिरी करण्याचे स्वप्न होते अशी दोन्ही स्वप्न पुर्ण झाली आहेत. देशासाठी सुवर्णपदक पटकावल्याचा आनंद खुप मोठा आहे. यापुढेही देशासाठी अनेक सुवर्णपदक पटकावण्याचा मानस आहे, असे काजल भोर हिने यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.