पुन्हा दिल्ली कनेक्शन; सर्व आरोपी पश्चिम बंगालमधील रहिवासी
पुणे – पेट्रोल पंपावर डेबिट कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांचे कार्ड क्लोन करणाऱ्या परप्रांतीय टोळीस सायबर सेलने जेरबंद केले आहे. हे गुन्हेगार पेट्रोल पंपावर कर्मचारी म्हणून काम करत होते. क्लोन केलेल्या कार्डचा डाटा ते दिल्ली स्थित त्यांच्या साथीदाराला देत होते. यानंतर त्यांचा साथीदार त्याद्वारे बनावट डेबिट कार्ड तयार करुन एटीएममधून पैसे काढून घेत होता.
मिथुन जमशेद अली, नोयल सादीक शेख, सईमुद्दीन अता उर रहेमान आणि जुल्फीकार अहमद दुलाल हुसेन (सर्व रा. जि.मालदा, पश्चिम बंगाल) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सात मोबाइल हॅन्डसेट, 20 बनावट डेबिट कार्ड, 12 ओरिजनल डेबिट कार्ड, ओळखपत्र, आधारकार्ड व रोख 1,230 रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मुख्य आरोपी दिल्लीमध्ये यातील जुल्फीकार याने तीन साथीदारांना तीन महिन्यांपूर्वी पुण्यात बोलावून घेतले होते.
मिथुन, नोयन, सईमुद्दीन यांना जुल्फीकारने स्किमर दिले होते. डेबिट कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्या नागरिकांचे कार्ड ते प्रथम स्किमरमध्ये स्वाइप कूेन त्याचा डाटा चोरत होते. या ग्राहकाने पेमेंट स्लीप घेतली नाही, तर त्याच्या पिन नंबर पेमेंट स्लिपच्यामागे लिहून घेतला जाई. ग्राहक पिन टाकताना चोरुन तो पाहिला जात होता. ही सर्व माहिती ते जुल्फीकारकडे देत होते. जुल्फीकार त्याचे नवी दिल्लीतील मित्र गुड्डू व रोहित यांना देत होता. ते दोघे माहितीच्या आधारे क्लोन कार्ड बनवत होते. तयार बनावट कार्डपैकी काही कार्ड आरोपींना रक्कम काढण्यासाठी दिले जात होते. यामध्ये जुुल्फीकारला महिन्याला 40 हजार, तर इतरांना प्रत्येकी 20 हजार दिले जात असल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त (सायबर व आर्थिक) संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त डॉ.शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे, पोलीस कर्मचारी अस्लम अत्तार, मंगेश नांगरे, अनिल पुंडलिक, सौरभ घाटे, आदेश चलवादी, बाळासाहेब कराळे, आनंद भंडलकर यांच्या पथकाने केली.
असा झाला टोळीचा पर्दाफाश
पुणे पोलिसांच्या सायबर सेलला मागील काही दिवसांत डेबिट कार्डद्वारे फसवणूक झालेल्या जवळपास 60 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याचे वर्गीकरण केले असता, यातील बहुतांश तक्रारी लष्कर परिसरातील एका ठराविक पेट्रोल पंपावरील आढळल्या. तपास केला असता टोळीचा पर्दाफाश झाला. यातील मिथुन, नोयब आणि सईबुद्दीन यांना ताब्यात घेण्यात आले. ती मागील तीन महिन्यांपासून संबंधित पेट्रोल पंपावर कामाला होते. ते पुण्यात एकाच खोलीत रहाणारे आहेत. नागरिकांनी पेट्रोल भरल्यानंतर कार्ड पेमेंट केल्यास त्यांच्या कार्डचा डेटा व पिन नंबर पेमेंट स्लिपवर लिहून घेऊन डेबिट कार्डची माहिती आणि पिन नंबर जुल्फीकारला देत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यालाही वडगाव शेरी येथील खोलीवर जाऊन ताब्यात घेण्यात आले.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
दरम्यान, या सर्व कारवाईनंतर सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे, की कोठेही कार्डद्वारे पेमेंट केले असल्यास कार्ड स्वाइप करताना कार्डचा क्रमांक कोणी पाहात नाही ना, याची खात्री करावी. तसेच प्रत्येक एक-दोन महिन्यांनी सर्व कार्डचे पिन क्रमांक बदलावेत. एखाद्या ठिकाणी काही संशयास्पद आढळल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. त्याची पोलिसांना मोठी मदत होईल.