मनपात दोन डॉक्‍टर अधिकाऱ्यांमध्ये वादावादी 

नगर  – महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे व डॉ. सतीश राजूरकर यांच्यात वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावरुन मोठा सावळा गोंधळ सुरु आहे. डॉ. बोरगे व डॉ. राजूरकर या दोघांनीही आपणाकडेच या पदाचा पदभार असल्याचा दावा केल्याने आरोग्य विभागातील कर्मचारीही चक्रावून गेले आहेत. नेमके वैद्यकीय आरोग्य अधिकारी कोण? कोणाचा आदेश पाळायचा असा संभ्रम आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना पडला आहे.

वैदुवाडी येथील बाबाजी शिंदे या मनपा कोंडवाडा विभागातील हंगामी कामगाराचा डेंग्युने मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन केले होते. याबाबत आयुक्तांनी उपायुक्त प्रदीप पठारे यांना चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशी अहवालावरुन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांना दोषी धरत आयुक्तांनी त्यांची 12 सप्टेंबर रोजी घनकचरा व्यवस्थापन व कोंडवाडा विभागात बदली केली होती. तर आरोग्य प्रशासन व व्यवस्थापनाचा पदभार डॉ.सतिष राजूरकर यांना स्विकारण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.

मात्र, महिनाभर डॉ.बोरगे यांनी पदभार सोडला नव्हता त्यामुळे त्यांना 9 ऑक्‍टोंबर रोजी आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्तांनी नोटीस काढत आरोग्य प्रशासन व व्यवस्थापनचा पदभार डॉ.राजूरकर यांच्याकडे देण्याचे आदेश दिले होते. 10 ऑक्‍टोबर रोजी डॉ.राजूरकर यांनाही पुर्वीचे कामकाज पाहून वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा पदभार तातडीने घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी (दि.15) डॉ. राजूरकर यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा पदभार घेत रुजू अहवाल उपायुक्तांना सादर केला होता.

या आदेशाचा सोईने अर्थ लावून डॉ.बोरगे यांनी आपणच महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर असल्याचा दावा केला. तसेच जुन्या महापालिकेतील आरोग्य विभागाचे सर्व साहित्य, खुर्च्या, टेबल उचलून पालिकेच्या नव्या ईमारतीत हलविले आहे. या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनाही नव्या पालिकेत हजर होण्याचे बजावल्याने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. नेमके आरोग्य अधिकारी कोण? कोणाचा आदेश पाळायचा याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.