मृतांची संख्या 16 वर, तर बाधितांची संख्या 240 वर पोहोचली
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधित आणि मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, आज दिवसभरात दोघांचा मृत्यू तर आणखी 9 जणांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये शहरातील सात जणांचा तर शहराबाहेरील दोघांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील एकाचा तर शहराबाहेरील एकाचा समावेश असून सातत्याने वाढणाऱ्या बाधितांच्या आणि मृतांच्या संख्येमुळे प्रशासनापुढील संकट आणखी तीव्र झाले आहे.
मंगळवारी प्रतिक्षेत असलेल्या संशयीतांचे अहवाल आज (बुधवारी) प्राप्त झाले. या अहवालानुसार शहरातील पाच पुरुषांना तर दोन महिलांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर शहराबाहेरील 31 आणि 36 वर्षीय दोन पुरुषांना लागण झाली आहे.
शहरातील पाच पुरुष हे 11 ते 37 वयोगटातील असून, दोन महिला या 25 ते 27 या वयोगटातील आहेत. आज बाधित असलेले सात जण हे आनंदनगर झोपडपट्टी, वाकड, रहाटणी, चिखली, आणि रावेत येथील रहिवाशी आहेत. तर पुण्यातील एक जण तर शिरवळ (सातारा) येथील एकाचा शहराबाहेरील बाधितांमध्ये समावेश आहे. या सर्वांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आज उपचार सुरू असताना येरवडा, पुणे येथील रहिवाशी असलेल्या 78 वर्षी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. तर दुपारी खराळवाडी येथील करोना बाधित असलेल्या व्यक्तीवर वायसीएममध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या 7 तर शहराबाहेरील मृतांची संख्या 9 झाली आहे. दरम्यान आज दिवसभरात सात रुग्ण करोनामुक्त झाले. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तळवडे, मोशी, जुनी सांगवी, खऱाळवाडी व ताडीवाला रोड येथील हे सात जण आहेत. त्यामुळे करोमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 135 झाली आहे. तर 240 जणांना करोनाची लागण झाली आहे.
सद्यस्थितीत 97 सक्रीय रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आज नव्याने 123 संशयीत वायसीएममध्ये दाखल झाले असून, 200 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
मावळ तालुक्यात दोन “पॉझिटिव्ह’
सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि. 20) आणखी सहा करोना संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये मावळ तालुक्यातील आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयात आज चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शिवाजीनगर, येरवडा, मावळ, काळेवाडी फाटा, बॉम्बे कॉलनी-दापोडी येथील रुग्णांचा समावेश आहे. 28 वर्षीय तरुणासह 4 पुरुष आणि 18 व 20 वर्षीय तरुणींचा त्यामध्ये समावेश आहे.