सेऊल : उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग-उन हे सध्या मृत्यूशी झुंज देत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचेही म्हटले जात आहे. त्यांच्यावर कार्डीओवॅस्क्यलरमुळे उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याचे म्हटले जात आहे.
किम जोंग उन यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. ते जास्त प्रमाणात धुम्रपान करत होते, तसेच त्यांना स्थुलतेचाही त्यांना त्रास असल्याचे सांगण्यात आले. ११ एप्रिल रोजी किम जोंग उन हे अखेरचे सर्वांसमोर आले होते. त्यानंतर १५ एप्रिल रोजी आपल्या आजोबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही ते सहभागी झाले नव्हते.