मागील ३ दिवसांपासून बेपत्ता असलेली भारतीय महिला क्रिकेटपटू राजश्री स्वेन हिचा मृतदेह पोलिसांना मिळाला आहे. राजश्रीच्या मोबाईल नेटवर्कच्या शेवटच्या लोकेशनवरून पोलिसांनी तपास लावला. ओडिशाची महिला क्रिकेटर राजश्री हिचा मृतदेह गुरुडिझहटिया जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या मृत्यूची बातमी बाहेर येताच क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. दरम्यान, राजश्रीच्या कुटुंबीयांनी ओडिशा क्रिकेट असोसिएशन आणि महिला संघाच्या प्रशिक्षकावर आरोप केले असल्याची माहिती समोर आली आहे.
कुटुंबीयांचा आरोप
राजश्रीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी हे आत्महत्त्येचे प्रकरण असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर याबाबत अधिकचा तपास सुरु असल्याचे सांगितले आहे. महिला क्रिकेटपटूचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली आहे. २२ वर्षीय राजश्रीच्या कुटुंबीयांनी प्रशिक्षकांवर आरोप केले आहेत की, ‘त्यांच्या मुलीची हत्या झाली आहे. तिच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या आणि डोळ्यांनाही इजा झालेली आहे.’
कुटुंबीयांनी पुढे म्हटले की, ‘ओडिशा क्रिकेट असोसिएशनने (ओसीए) बज्रकाबती परिसरात आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरात राजश्रीसह सुमारे २५ महिला क्रिकेटपटू सहभागी झाल्या होत्या. हे शिबिर आगामी पुद्दुचेरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी लावण्यात आले होते. त्यानंतर या शिबिरातून १० जानेवारीला महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. मात्र, यामध्ये राजश्रीचे नाव यादीतन आल्याने ती निराश होऊन शिबिरातून बाहेर पडली होती आणि तेव्हापासूनच ती बेपत्ता होती.’
“पैसे घेऊन संघात निवड होतेय…”
राजश्री प्रशिक्षण शिबिरातुन बाहेर पडल्यानंतर ११ जानेवारीपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह सापडल्यानंतर आता राजश्रीच्या चुलत भावाने एक मोठा खुलासा केला आहे. राजश्री बेपत्ता झाली त्याच दिवशी तिने चुलत भावाला संपर्क केला आणि ‘संघात पैसे घेऊन निवड केली जातेय’ असे म्हटले होते. तिच्या चुलत भावाने सांगितले की, ‘राजश्रीने फोनवर सांगितले होते की, काही खेळाडूंना पैसे देऊन संघात समाविष्ट केले होते आणि तिला वगळण्यात आले होते. या कॉलनंतर आम्ही पुन्हा तिला फोन करण्याचा प्रयत्न केला असता राजश्रीचा मोबाईल बंद होता. ती मजबूत होती आणि ती आत्महत्या करू शकत नव्हती, ती एक अष्टपैलू खेळाडू देखील होती. तिने मला शेवटच्या वेळी 11 जानेवारी 2021 रोजी फोनवर सांगितले होते की, ती ओडिशा क्रिकेट असोसिएशन टीम आणि प्रशिक्षकांशी वारंवार नकार दिल्याबद्दल चर्चा करणार आहे.’ अशी माहिती प्रसार माध्यमांतून समोर आली आहे.
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
कटकचे डीसीपी पिनाक मिश्रा म्हणाले की, ‘राजश्रीचा मृतदेह अथागढ भागातील गुरुडिझहटिया जंगलात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. राजश्रीच्या प्रशिक्षकाने गुरुवारी (१२ जानेवारी) कटकमधील मंगलाबाग पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. राजश्रीचा मृतदेह सापडल्यानंतर गुरुडिझहटिया पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येणार आहे. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप पोलिसांना समजलेले नाही, अशी माहिती प्रसार माध्यमांकडून समोर आली आहे.
Odisha | Body of a woman cricketer from Odisha, Rajashree Swain found dead inside a dense forest near Cuttack city. Her body was found hanging from a tree. She was missing since Jan 11, and her coach had filed a complaint on 12th Jan: Pinak Mishra, DCP, Cuttack (13.01) pic.twitter.com/MkHzrNMDwk
— ANI (@ANI) January 14, 2023
Sad to know about the demise of budding Odia women cricketer Rajashree Swain. My condolences to her family. Om Shanti 🙏
I appeal Odisha govt to inquire into her cause of death! https://t.co/lz9lDq0IQJ
— Niranjan Patnaik (@NPatnaikOdisha) January 14, 2023