नारायणगाव (पुणे) – ओझर (ता. जुन्नर) कोविड सेंटरमध्ये करोना स्वॅब चाचणी झाल्यानंतर 67 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि. 3) दुपारी घडली.
सावरगाव येथील ज्येष्ठ व्यक्ती ओझर येथे स्वॅब चाचणीसाठी आली होती. रांगेत थांबून या ज्येष्ठाने स्वॅब चाचणी झाल्यानंतर अहवालासाठी ते कोविड केंद्राबाहेरील आवारात थांबले होते. त्यानंतर दीड तासानंतर त्यांच्या मुलाने येवून बाबांना त्रास होत असल्याचे सांगितल्याने कोविड केंद्रातील डॉक्टरांनी तपासले असता ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्यांना नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका बोलवली असता काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
या ज्येष्ठाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच त्यांना आगोदरच हृदयाची समस्या असल्याने त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला असवा, असा अंदाज कोविड सेंटरच्या प्रमुख डॉ. वर्षा गुंजाळ यांनी वर्तवला आहे. दरम्यान, कोविड सेंटरमध्ये स्वॅबसाठी रांगा लावाव्या लागत असून अधिक वेळ ताटकळत रहावे लागत असल्याबाबत तक्रारी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने सुधारणा करण्याची मागणी जोर धरीत आहे.