नगरपालिकेने नाल्यांची सफाई न केल्याने नागरिकांच्या घरात शिरले पाणी

संगमनेर – शहरात गुरुवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसानंतर शिवाजी नगर परिसरातील तसेच शहरातील विविध भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. शहरातील पावसाळी वाहिन्या, नाले तुंबून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. संगमनेर नगरपालिकेने पावसाळी वाहिन्या, नाल्यांची योग्य प्रकारे सफाई न झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून शहराच्या उपनगरांमध्ये ठिकठिकाणी पावसाळी वाहिन्या, नाले तुंबण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता केल्याचा पालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. शहरात गुरुवारी जोरदार पाऊस झाल्यानंतर शिवाजीनगर परिसर, स्टेडियमच्या परिसर, तसेच अनेक उपनगरांमधील अनेक घरांत आणि दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. काही घरांमध्ये अक्षरशः गुडघ्याइतके पाणी भरले होते. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. 

अनेकांना रात्रभर घरात घुसलेले पाणी उपसावे लागले. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली होती. याशिवाय अनेक चौकादरम्यानच्या रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे या बाजूच्या दुकानांमध्ये पाणी शिरले होते. दरम्यान, या भागात नालेसफाई आणि पावसाळी वाहिन्यांच्या स्वच्छतेची कामे व्यवस्थित झाली नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाश्यांनी केला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात आमच्या घरात पाणी शिरते दरवर्षी आम्ही पालिकेला विनंती करतो की, आमच्या दारासमोरील गटार व्यवस्थित करा. सदर गटार ही अरुंद आणि खोली कमी आहे त्यामुळे थोडा पाऊस झाला तरी त्यातून पाणी बाहेर पडून आमच्या घरात घुसते. नेहमीप्रमाणे ते फक्त आश्वासने देतात तरी आमची पालिकेला विनंती आहे की शहरातील गटारी स्वच्छ करून आमच्या येथील गटारीची रुंदी वाढवावी जेणेकरून आमच्या घरात पाणी शिरणार नाही.

– शंकर गायकवाड, शिवाजीनगर, वैदवाडी, रहिवाशी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.