मुंबई – दे धक्काच्या भरगोस यशानंतर आता पुढचा धक्का थेट इंग्लंडहून बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दे धक्का २ च्या ट्रेलरची सर्वांनाच प्रतीक्षा होती. हा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आपल्या त्याच गावरान तडक्यात सर्व पात्र पुन्हा एकदा विदेशात धुडगूस घालण्यासाठी तयार असल्याचे पाहायला मिळते. दे धक्काच ट्रेलर चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.
येत्या ५ ऑगस्टला दे धक्का २ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. यंदाची वारी ही थेट विदेशात असल्याने धनाजी तिथं काय काय कांड करणार हे पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. धनाजी आणि कुटूंबासमोर नेमकं कोणतं मोठं आव्हान असणार आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु ट्रेलरवरून चित्रपट चांगलाच कॉमेडी असल्याचं दिसून येतंय.
विशेष म्हणजे लंडनला जाऊनही यातील एकही पात्र आपली मूळ ओळख विसरलेला वाटत नाही. अगदी मकरंद जाधव, धनाजी, हेमल्या ही सर्व पात्र त्यांच्याच स्टाईलमध्ये लंडनमध्ये धुमाकूळ घालताना ट्रेलरमध्ये दिसत आहेत. ट्रेलरमधील लिटिल..लिटिल सारखे डायलॉग जुन्या दे धक्काची आठवण करून देतात तर मराठी माणसाला कमी लेखायचं नाय असं म्हणणारा मकरंद जाधव स्वाभिमानी मराठी उद्योजन असल्याचे दाखवून देतो. एकूणच दे धक्काचा हा विदेश प्रवास प्रेक्षकांसाठी भन्नाट पर्वणी ठरणार आहे.