अंबरनाथमध्ये गोळीबार करून ज्वेलर्स दुकानावर दरोडा; 25 तोळे सोनं लंपास

कल्याण – अंबरनाथमधील भवानी ज्वेलर्सच्या दुकानावर भरदिवसा दरोडा घालत गोळीबार व चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरोड्याचा उद्देशाने आलेल्या चार हल्लेखोरासमवेत दुकानाच्या मालकासह दोघाची झटापट झाली.

यावेळी दरोडेखोरांनी गोळीबार करत चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही जखमी झालेत. दरम्यान या दरोडेखोरांनी सुमारे 25 तोळे सोने लंपास करत तेथून पळ काढला.

ही घटना आज दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. दुचाकीवरून आलेले चार हल्लेखोर दुकानात शिरले आणि त्यांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा आणि चाकूचा धाक दाखवून दुकानातील मुद्देमाल लुटला. त्यानंतर चारही जण मुद्देमाल घेऊन दुकाना बाहेर पडत असताना दुकानाचे मालक बलीत सिंग, लक्ष्मण सिंग तिथे आले आणि त्यांनी या हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला.

यावेळी दुकानाचा कर्मचारी भैरव सिंग हा देखील आला. या सर्वांमध्ये झटापट झाली. यावेळी हल्लेखोरांनी आपल्याजवळील बंदूकीतून या तिघांवर पाच ते सहा राऊंड फायर केले. तसेच चाकूने हल्ला केला. यात तिघेजण जखमी झाले असून त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या हल्ल्यानंतर दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी पाच पथक विविध ठिकाणी रवाना केली आहेत. दिवसाढवळ्या भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पाच पथक तयार करत ठिकठिकाणी नाकाबंदी लावून आरोपीचा शोध घेत असल्याचे डीसीपी प्रशांत मोहिते यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.