ता. 12, माहे ऑक्टोबर, सन 1976
पेकिंग – सशस्त्र उठावाचा कट केल्याबद्दल चीनचे दिवंगत राष्ट्रपिता माओ-त्से-तुंग यांची पत्नी चिआंग चिंग व इतर 3 बड्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे. तथाकथित “शांघाय मॅफिया’चे सदस्य वॅंग हुंग, वेन चॅंग चुनचिआओ व याओ वेन युआन, ही अटक केलेल्या इतर तिघांची नावे आहेत, असे सांगितले गेले.
चिआंग चिंग व हे तिघेही जण पक्षाच्या पॉलिट ब्यूरोचे डाव्या गटाचे सुधारणावादी सदस्य आहेत. वांग हुंग-वेन, हे तर पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. गेल्या वर्षीपर्यंत माओंचे वारस म्हणून त्यांचे नाव घेण्यात येत होते. चॅंग चुन-चिआयो हे उपपंतप्रधान असून अटक केलेल्या चौघात सर्वाधिक शक्तिशाली आहेत.
वसंतदादांची निवृत्तीची कल्पना चांगली
पुणे – वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त होण्याची वसंतदादांची कल्पना चांगली आहे. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांना राजकारणात संधी मिळणार आहे, असे राजारामबापू पाटील म्हणाले.
सहकारी चळवळ गरिबांची संजीवनी ठरली पाहिजे
पुणे – देशातील गरिबी घालविण्यासाठी नियोजनबद्ध शिस्तीचे प्रयत्न हिरीरीने झाले पाहिजेत. गरिबीचा हा प्रश्न सामुदायिक शहाणपणाने आणि प्रयत्नाने सोडविला पाहिजे, त्यादृष्टीने सहकारी चळवळ संजीवनी ठरली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.