तपास सुरु : दहशतवाद्यांना दिल्लीत पोहोचवण्यासाठी लाखो रुपये
नवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यातील कुलगाम येथे दहशतवाद्यांसोबत अटक करण्यात आलेल्या जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधिक्षक दविंदर सिंगचे संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा आरोपी अफजल गुरुशी संबंध असल्याचे समजते.
तसेच दहशतवाद्यांना आधी चंदिगड आणि नंतर दिल्लीला सुरक्षित पोहोचवण्यासाठी लाखो रुपये घेतले होते. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असून चौकशीत नवीन गोष्टींचा खुलासा होत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी अफजल गुरुने कथितपणे दविंदर सिंग यांचे नाव घेतले होते.
त्यामुळे या दोघांमध्ये नेमके काय संबंध होते याचा तपास सध्या सुरु आहे. भारतीय संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी घडवून आणला होता.
या हल्ल्यात 14 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांमध्ये सहभाग असणाऱ्या अफजल गुरुला दोषी ठरवित 9 फेब्रुवारी 2013 रोजी फाशी देण्यात आली होती. हिजबूल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांसोबत अटक झालेले जम्मू काश्मीरचे पोलीस उपअधिक्षक दविंदर सिंग श्रीनगर विमानतळावर तैनात होते.
महत्त्वाचं म्हणजे दहशतवादाविरोधातील मोहिमेत निभावलेल्या भुमिकेबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक देत गौरव करण्यात आला आहे. ते दहशतवादी विरोधी टीमचाही भाग होते. जम्मू काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले, डीएसपी दविंदर सिंग यांची दहशतवाद्यांप्रमाणेच चौकशी केली जाईल.
तसेच हे प्रकरण गांभीर्याने घेतले जात असून सर्व सुरक्षा यंत्रणांकडून त्यांची चौकशी होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच दविंदर सिंग यांच्या निवासस्थानावरून तीन एके-47 रायफल आणि पाच हॅण्ड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत.