कलंदर: योगायोग

उत्तम पिंगळे

काल प्राध्यापक विसरभोळ्यांच्या घराची बेल दाबली व हातात मोबाइल घेऊन सरांनी दार उघडले. मला पाहताच म्हणाले, बघा काय योगायोग तुम्हालाच फोन करत होतो. त्यांनी कॉल दाखवलाही व माझ्या फोनची बेलही वाजू लागली. मला म्हणाले, गेले दोन आठवडे तुम्ही बिलकुल फिरकला नाहीत. त्यावर मी म्हणालो काही आर्थिक वर्षाखेरची कामे वगैरे होती म्हणून वेळ मिळाला नाही.

योगायोग शब्दाचा धागा पकडून सर म्हणाले, तुमच्या योगायोगावर विश्‍वास आहे का? मी होय म्हणालो. मग सर म्हणाले, आता राजकीयदृष्ट्या पाहा, स्वातंत्र्योत्तर काळात कोकण विभाग शक्‍यतो कॉंग्रेसपासून दूर राहिला त्यामुळे केंद्रात कॉंग्रेसची सरकारे व कोकणात विरोधी खासदार त्यामुळे म्हणावा तसा कोकणचा विकास झाला नाही हा योगायोगच. लक्षद्वीपचे कॉंग्रेसचे खासदार पी. एम. सईद 1967 ते 2004 पर्यंत सलग दहा वेळा निवडून गेले. त्यांनी अनेक राज्यमंत्री पदे व उपाध्यक्षपदही भूषविले. पण 2004च्या निवडणुकीत 11व्यांदा निवडणूक लढवताना ते जनता दलाच्या उमेदवारांकडून केवळ 71 मतांनी पराभूत झाले व नंतर मनमोहन सिंग यांचे सरकार दहा वर्षे राहिले. अर्थात, 2004 साली त्यांना ऊर्जा मंत्रिपद राज्यसभेवर घेऊन दिले पण वर्षभरात ते स्वतःच निवर्तले. सलग दहा लोकसभा निवडणूक जिंकणारे सलग दहा वर्षांच्या कॉंग्रेस सरकारात नव्हते हा योगायोग.

कित्येक सेलिब्रिटीज ज्यांनी सुरुवातीच्या काळात खूप स्ट्रगल केले व आता अत्यंत मानाच्या स्थानावर असताना आईवडिलांचे छत्र नसते, त्याची खंत बोलून दाखवतात. सामान्य माणूसही कित्येकवेळा भाड्याच्या घरात किंवा चाळीत राहणारा अत्यंत कष्टाने आपल्या मुलांना मोठे करतो व ती मुलेही खरोखर कर्तबगार निघून जेव्हा स्वतःच्या बंगल्यात राहायला जातात, घरात गाडी येते पण त्यावेळी ते पाहण्याकरिता ते वडीलधारी नसतात हा योगायोगच. फार थोड्यांच्या नशिबी आपल्या मुलांची कर्तबगारी पाहण्याचे सुख येते.

दररोजच्या जीवनात अशा कित्येक गोष्टी घडत असतात. चांगला अभ्यास करून चांगले कॉलेज मिळावे असे असताना गेल्या वेळेपेक्षाही मेरिट खाली येऊनही आपल्याला आणखी कमी गुण मिळावे हा योगायोगच. आपण कित्येक वेळा पाहतो की रस्त्यावरील टोलनाक्‍याची सर्वात छोटी रांग आपण पकडतो आणि आपली गाडी लागल्यावर बाकीच्या रांगां भराभरा पुढे सरकतात व आपलीच रांग मंद होते. ऑफिसला जाण्यासाठी एखादे वेळी नेहमीची लोकल चुकू नये म्हणून आपण रिक्षा करावी आणि रिक्षा ट्रॅफिकमध्ये जाम व्हावी हा योगायोगच. कधी कधी गाडी गेलीच असणार म्हणून आपण आरामात फलाटावर उभे राहावे व तीच गाडी उशिरा असल्याने आपल्याला बरोबर मिळावी हाही योगायोगच. घरातील प्रत्येक कुटुंबीयांच्या नावावर आपण शेअरसाठी किंवा सिडको लॉटरीसाठी अर्ज करावा व सर्व अर्ज नामंजूर होऊन यावेत व शेजाऱ्यांची केवळ एकच अर्ज भरून त्याला नेमके ते मिळावे हा योगायोगच. चांगल्या वरिष्ठांच्या हाताखाली एखादा प्रयोग सतत सफल न होणे व वरिष्ठांची बदली होऊन खडूस वरिष्ठ येणे व नेमका तोच प्रयोग सफल होणे ज्याचे त्या नवीन वरिष्ठाला सोयरसुतक नसते हा ही योगायोगच. शेवटी नियतीचे नियम हे ठरलेले आहेत. तिच्याप्रमाणेच या विश्‍वातील घडामोडी योग्य वेळ आल्यावरच होत असतात. आपल्या बाबतीत अचानक एखादी चांगली वा वाईट गोष्ट घडली की आपण त्यास योगायोग समजतो जे नियतीने आधीच ठरवलेले असते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)