नवी दिल्ली – लंडनमधील एका फुटबॉल मैदानाची पाहणी करण्यासाठी आलेला इंग्लंडचा प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमने देखील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धा रद्द होत आहेत, त्यावरूनच करोनाची व्याप्ती लक्षात येते, यासाठी जबाबदार असलेल्यांना दोष देत बसण्यापेक्षा आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत बेकहॅमने आपले मत व्यक्त केले.
करोना विषाणूमुळे जगभर कोविड-19 या रोगाची साथ पसरलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही महामारी असल्याची घोषणा केलेली आहे. त्यानंतर जगभरातील नामांकित आणि मोठमोठ्या क्रीडा संघटनांनी आपल्या सर्व क्रीडा स्पर्धा एकतर रद्द केल्या आहेत अथवा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे अनेक क्रीडापटूंनी करोनामुळेच जागतिक क्रीडा स्पर्धांचे व त्यात सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या कारकिर्दीवर विपरीत परिणाम झाला आहे, अशा शब्दांत टीका केली आहे.