लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांना बुधवारी उत्तरदायित्व न्यायालयाने “मनी लॉंडरिंग’ प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे. लाहोरच्या अकाउंटबिलिटी कोर्टाने मरियम यांच्या कोठडीमध्ये आणखी मुदतवाढ मिळावी यासाठी राष्ट्रीय उत्तरदायित्व ब्युरो (एनएबी)ने दाखल केलेली याचिका फेटाळली.
कोर्टाच्या आदेशानंतर मरियम यांना कोट लखपत तुरुंगात हलवण्यात आले, तिथेच त्यांचे वडील नवाझ शरीफ हे अल-अजीजिया मिल्स भ्रष्टाचार प्रकरणात सात वर्षांची शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे वडील-मुलगी जोडी आता एकाच तुरूंगात आहेत. चौधरी साखर कारखान्याच्या खटल्याच्या संदर्भात पीएमएल-एनच्या उपाध्यक्षा मरियम यांना 8 ऑगस्ट रोजी कोट लखपत कारागृहातून अटक करण्यात आली होती. या तुरुंगात वडिलांची भेट घेऊन परतत असताना त्यांना अटक करण्यात अली होती. मनी लॉंडरिंग प्रकरणी न्यायालयाने शरीफ यांचे पुतणे युसूफ अब्बास यांनाही 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावून तुरूंगात पाठविले आहे.