अल्पवयीन मुलीला पोलिसांची जबरदस्ती
कानपूर – देशात करोनाशी लढणारे पोलीस हे “करोना योद्धे’ ठरत असतानाच उत्तर प्रदेशात मात्र पोलिसांनीच माणुसकीला काळिमा फासल्याची घटना घडली आहे. येथील गोविंद नगर भागात एक अल्पवयीन मुलगी भाडेकरू म्हणून राहात आहे. तिने घरमालकाच्या पुतण्याविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी आली असताना पोलिसांनी तिला डान्स कर, तरच गुन्हा नोंदवू व त्यानंतरच मदत करू, असे फर्मान काढले. या मुलीने सोशल मीडियावर याबाबत संताप व्यक्त करणारा व्हिडीओ पोस्ट केल्याने आता राज्यातील पोलीस वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
या घटनेची गंभीर दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली असली तरीही यात तथ्य नसल्याचेही काही व्यक्तींनी सांगितले आहे. या मुलीचे तिच्या घरमालकांच्या पुतण्याशी गेल्या अनेक काळापासून वाद सुरू आहेत. तिची तक्रार यापूर्वी दाखल करून घेण्यात आली होती. मात्र, तक्रारीत विरोधाभासही आढळून आला होता. त्यामुळे पोलिसांवर दडपण आणण्यासाठीच तिने हा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केला असावा अशी शक्यताही सर्कल अधिकारी असणाऱ्या विकास कुमार पांड्ये यांनी व्यक्त केली आहे.
या मुलीने घरमालकाच्या पुतण्यासंदर्भात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी आरोपीवर कारवाई करण्याऐवजी मलाच पोलीस स्टेशनमध्ये डान्स करण्यास सांगितल्याचा आरोप या मुलीने केला आहे.