पुणे/आंबेगाव बु. – मृत्यूला दारातून परतवून लावण्याच्या अनेक कहाण्या आपण ऐकतो…वाचतो…अशातच एका बाळाची मृत्यूशी असणारी झुंज तब्बल 35 दिवस सुरू होती. व्हेंटिलेटरवर, ऑक्सिजनच्या प्रत्येक श्वासागणिक ती तीव्र होत होती. पण, अखेरीस तो जिंकला…हे युद्ध जिंकणारा हा योद्धा आहे अवघ्या 38 दिवसांचा, हे त्याचे विशेष.
हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेने दि.12 जुलै रोजी गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, त्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तत्काळ भारती विद्यापीठ रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये (नवजात बालक अतिदक्षता विभाग) दाखल करण्यात आले. तपासण्यांअंती बाळाला करोना संसर्ग झाल्याचे समोर आले. त्याचवेळी आईचीही तपासणी केली असता, तिच्या शरीरात “सार्स-2 ऍन्टिबॉडीज’ आढळून आल्या. त्यामुळे आईला करोना होवून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली.
बाळाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला व्हेंटिलेटर लावण्यात आला. फुप्फुसात “सर्फेक्टंट’ नावाच्या औषधाचे दोन डोस देण्यात आले. तरीही बाळाला शंभर टक्के ऑक्सिजन आवश्यक होता. त्यामुळे त्याला “हाय फ्रिक्वेंसी व्हेंटिलेटर’ या विशेष प्रकारच्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तसेच “इंट्रावेनस इम्युनोग्लोबुलिन’ ही विशेष थेरेपीही दिली. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत झाली. रोगाच्या तीव्रतेमुळे आणि पालकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर बाळाला 5 दिवस उच्च डोस स्टिरॉइड्स (मेथिलप्रेडनिसोलोन) दिले गेले. त्यानंतर बाळाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली.
बाळ 22 दिवस व्हेंटिलेटरवर राहिले, त्यापैकी “हाय फ्रीक्वेंसी व्हेंटिलेटर’ 16 दिवस होते. तब्बल 25 व्या दिवशी बाळाला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. त्याचा छातीचा सिटी स्कॅन केला असता, फुप्फुसात काही “फायब्रोसिस’ दिसून आले. असे “फायब्रोसिस’ गंभीर कोविड-19 मधून बरे झालेल्या व्यक्तींमध्ये दिसून आले. काही दिवसांच्या ऑक्सिजन थेरेपीनंतर, तब्बल पाच आठवड्यांनंतर 35 व्या दिवशी बाळाला घरी सोडण्यात आले.
एक्सरेमध्ये बाळाच्या दोन्ही फुफ्फुसांत विस्तृत पसरलेला न्यूमोनिया दिसत होता. त्यावर विविध उपचार करण्यात आले. “हाय फ्रिक्वेंसी व्हेंटिलेटर’ ठेवणे विशेष बाब असून, अशा परिस्थितीत बाळ बरे झाले असून, त्याला घरी सोडले. ही एक अपवादात्मक घटना आहे. त्यासाठी रुग्णालयाचे संजय ललवाणी आणि संपूर्ण टीमचे परिश्रम आहेत.
– डॉ. प्रदीप सूर्यवंशी, प्रमुख, नवजात बालक अतिदक्षता विभाग