जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचा द्रुतगती गोलंदाज डेल स्टेनने कसोटी कारकिर्दीस रामराम ठोकला आहे. मात्र, मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये त्याचा सहभाग राहणार आहे.
स्टेनला गेल्या चार वर्षांमध्ये अनेक वेळेला दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. तो म्हणाला, काही वेळेला दुखापत खूप मोठी नसते. या दुखापतीकडे दुर्लक्ष करीत आपण खेळत असतो. मात्र, कसोटीमध्ये पाच दिवस अशी दुखापत असताना खेळणे अशक्य आहे. आपल्याऐवजी अन्य गुणवान खेळाडूला संधी मिळेल या हेतूनेच मी हा निर्णय घेतला आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात दुखापतीस विसरून जाणे शक्य असते. सध्या तरी या स्वरूपाच्या सामन्यांमध्ये मी खेळत राहणार आहे. ज्यावेळी हे सामने खेळणे अशक्य होईल, त्यावेळी मी स्पर्धात्मक क्रिकेटमधूनही निवृत्त होईन.
स्टेनने 2004 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्याद्वारे कसोटीत पदार्पण केले. यंदा फेब्रुवारीत श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत तो खेळला. ही त्याची अखेरची कसोटी होती. त्याने आतापर्यंत 93 कसोटींमध्ये 22.95 च्या सरासरीने 439 विकेट्स घेतल्या. एकाच डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद करण्याची पराक्रम त्याने 26 वेळा केला आहे. एकाच सामन्यात 10 किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याचा मान त्याने पाच वेळा मिळविला आहे. त्यामध्ये त्याने 2013 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केवळ 60 धावांमध्ये 11 गडी बाद केले होते.
भारताविरुद्ध 2010 मध्ये नागपूर येथील कसोटीत त्याने 51 धावांत 7 विकेट्स घेतल्या होत्या. ही त्याची एकाच डावातील सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने 2008-09 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत आफ्रिकेला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.