पुणे – जिल्ह्यातील पुणे मेट्रो प्रकल्प, रिंगरोड, पुणे -नाशिक रेल्वे, इंद्रायणी मेडिसिटी आदी महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरुवात केली आहे. प्रकल्पांची सद्यस्थिती, प्रगती, अडथळे आणि निधीची उपलब्धता या सर्वांचा आढावा बैठकीत घेण्यात येत आहे. पवार यांनी दर पंधरा दिवसांनी प्रोजेक्ट मॉनिटरिंग कक्षाद्वारे अशा प्रकारची बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महत्त्वाच्या पायाभूत विकासप्रकल्पांच्या उभारणीतील अडथळे तत्काळ दूर होऊन हे प्रकल्प वेळेत मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
महाविकास आघाडीच्या काळात उपमुख्यमंत्री असताना पवार यांनी राज्यातील विविध प्रकल्पांच्या कामास गती देण्यासाठी प्रोजेक्ट मॉनिटरिंग कक्ष स्थापन केला होता. त्यावेळी पवार हे दर आठवड्याला प्रकल्पांचा मंत्रालयातून आढावा घेत होते. त्यामुळे विविध प्रकल्पांस जागा मिळणे, प्रशासकीय मान्यता मिळालेली होती. तर काही प्रकल्पांची कामे सुरूदेखील झाली आहे. आता पवार हे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पवार यांनी महिनाभरानंतर पुन्हा राज्यातील प्रकल्पांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात घेतलेली “प्रोजेक्ट मॉनिटरिंग कक्षा’ची बैठक ही 24 वी बैठक होती.
राज्यातील विकासप्रकल्पांना केंद्राची मंजुरी, मदत, सहकार्य मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केला जाईल. मुख्य सचिवांसह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, “वॉर रुम’चे प्रमुख राधेश्याम मोपलवार हे सर्वचजण कक्षाच्या बैठकीला उपस्थित राहून “वॉर रुम’ तसेच “प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’च्या माध्यमातून योगदान देत आहेत.
जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेले प्रकल्प
मेट्रो, “सारथी’चे प्रशिक्षण केंद्र, पुणे रिंग रोड, शिवाजीनगर येथील कृषी भवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणी भवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी, पोलीस गृहनिर्माण प्रकल्प, शिरुर-खेड-कर्जत मार्गाचे चौपदरीकरण, वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आदी प्रकल्पांचा आढावा दर पंधरा दिवसांनी घेतला जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले.