न्याय मिळवून देण्याचा दिला शब्द : परिंचेतील उपोषण मागे
परिंचे (पुणे) – परिंचेतील उपोषणकर्त्यांना 15 दिवसांत न्याय मिळवून देणार असल्याचा शब्द आमदार संजय जगताप यांनी दिल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य अनिल जाधव व सेवानिवृत्त शिक्षक निवृत्ती शेडगे यांनी उपोषण मागे घेतले. तर 15 दिवसांत न्याय न मिळाल्यास जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.
परिंचे (ता. पुरंदर) ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण व श्री भैरवनाथ दूध उत्पादन संस्थेने गायरान जागेत बांधलेले व्यापरी संकूल शासनाकडे हस्तांतरीत करण्यासाठी उपोषण सुरू करण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी आमदार संजय जगताप यांनी थेट उपोषणस्थळ गाठात मध्यस्थी केली व कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर त्यांच्याच हस्ते जाधव व शेडगे यांनी लिंबू पाणी घेत उपोषणाची सांगता केली.
आमदार संजय जगताप म्हणाले की, ग्रामपंचायतीचे भ्रष्टाचाराचे प्रकरण गंभीर असून खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. येत्या 15 दिवसांत विभागीय आयुक्तांकडे बैठक होणार असून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच दूध संस्थेच्या संकुलाच्या प्रकरणाची सुनावणी महसूल मंत्र्यांकडे सुरू असून लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची महसूल मंत्र्यांना विनंती करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी हेमंतकुमार माहुरकर, पिनुशेठ काकडे पुष्कराज जाधव, मयूर मुळीक, शरद जगताप, निलेश जाधव, उल्हास जाधव, अरविंद शिवतारे, विजय जाधव, सुशीलकुमार जाधव, बाळ मुळीक, रवींद्र जाधव, संजय जाधव उपस्थित होते.