लंडन : शालेय पातळीवर सर्वच विद्यार्थी निबंध लिहीत असतात. या निबंधाच्या विषयाप्रमाणे विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती विस्तारत असते. 1969 मध्ये एका विद्यार्थिनीने भविष्याबाबत लिहिलेल्या निबंधातील बहुतेक गोष्टी आता खऱ्या होताना दिसत आहेत. या विद्यार्थिनीने 1969 मध्ये लिहिलेला हा निबंध आता व्हायरल होत असून त्यामध्ये तिने भविष्यामध्ये कोणते तंत्रज्ञान विकसित होऊ शकेल आणि कोणत्या गोष्टी वापरात येऊ शकतील याचे एक चित्र मांडले होते.
या मुलीने भविष्यातील तंत्रज्ञानाचा अंदाज बांधणारा हा निबंध लिहिला होता आणि तो घरातील सोफ्यामध्ये ठेवला होता. 55 वर्षानंतर हा निबंध उजेडात आला. त्यामध्ये या विद्यार्थिनीने लिहीलेल्या अनेक गोष्टी उजेडात आल्या आहेत. आता ज्या व्हिडिओ मीटिंग किंवा तंत्रज्ञानाचा वापर ज्या प्रकारे केला जात आहे. त्याचा सर्व उल्लेख या निबंधामध्ये आढळतो. आणखीन काही वर्षांनंतर मानवी समाज संपूर्ण जेवण न जेवता अत्यंत कमी स्वरूपात एखाद्या चिंगमच्या आकाराचा आहार घेईल, अशा प्रकारची भविष्यवाणी सुद्धा या निबंधात करण्यात आली आहे. ती मात्र आत्तापर्यंत प्रत्यक्षात आलेली नाही.
फर्निचर दुरुस्तीचे काम करणाऱ्या पीटर डकर्टटन नावाच्या एका व्यक्तीला या सोफ्याची दुरुस्ती करत असताना हा निबंध सापडला. या निबंधावर 23 फेब्रुवारी 1969 अशी तारीख असून निबंधाच्या सुरुवातीला या विद्यार्थिनीने तिचा पती कामावरून परत घरी परत आला आहे, अशी कल्पना करून लिहिला आहे. कामावरून परतल्यानंतर या पतीने एक व्हिडिओ कॉल केल्याचा उल्लेख निबंधात आहे. वास्तविक1969 मध्ये अशी कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. पीटर डकर्टटन आणि त्याच्या पत्नीने हा निबंध वाचल्यावर त्यांना त्याचे महत्त्व लक्षात आले आणि त्यांनी त्याचे फोटो काढून हा निबंध व्हायरल केला सध्या याच निबंधाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.