पुणे । पार्सल फ्रॉडच्या माध्यमातून लाखो रुपयांचा गंडा घालण्याचे प्रकार दिवसें दिवस वाढत चालले आहेत. यामध्ये पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले असून बँक खाते दहशतवादी कारवायांसाठी लिंक असल्याची भिती घालून फसवले जात आहे. मात्र अशाच एका पार्सल फ्रॉडच्या घटनेत तरुणीला चक्क ऑन कॅमेरा तपासणीचा भाग म्हणन अंगावरील तीळ दाखवण्यास भाग पाडले. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आयटी अभियंता असलेल्या एका तरुणीने तक्रार दिली आहे. या तरुणीला ब्लॅकमेल करत पाच महिण्यात तब्बल १४ लाखाचा गंडा घालण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी २८ वर्षीय तरुणी लोहगाव परिसरात रहाते. तीला नोव्हेंबर २०२३ मध्ये फेडेक्स कंपनी मुंबई आणि नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चे अधिकारी असल्याचे भासवण्यात आले. तीला सांगण्यात आले की तीच्या नावाने तैवानला पार्सल चालले आहे. यात पाच पासपोर्ट ,आयसीआय बँकेचे सहा क्रेडीट कार्ड आणि ९५० ग्रॅम ड्रग्ज सापडले आहे. हे पार्सल नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो मुंबईने पकडले आहे. तसेच तुमचे बँक खाते दहशतवाद्यांशी संबंधीत असल्याची भिती घातली. त्यानंतर १३ लाख ९४ हजार रुपये चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यात वर्ग करुन घेतले. तसेच आमची लेडी ऑफीसर बोलत असून शरीरावरील तीळ स्काईप आयडीवरुन दाखविण्यास भाग पाडले. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार करत आहेत.