Tamil Thalaivas vs Puneri Paltan, Pro Kabaddi League : प्रो कबड्डी लीग 2023-24 मध्ये, रविवारी नेताजी इनडोअर स्टेडियमवर पुणेरी पलटणने तामिळ थलायवासचा 56-29 गुणांनी पराभव करून गुणतालिकेत पुन्हा एकदा पहिले स्थान मिळवले आहे. पलटनच्या या विजयामुळे तमिळ थलायवाससह यू मुंबाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. तर स्पर्धेत चतुरस्त्र दर्शन घडविणाऱ्या पुणेरी पलटण संघाने या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.
Another day, another Paltan slay 🧡🔥
Powered by superb performances from Pankaj Mohite and Chiyaneh, Puneri Paltan stormed through Tamil Thalaivas 💪#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #CHEvPUN #TamilThalaivas #PuneriPaltan pic.twitter.com/XuvTrl7GiJ
— ProKabaddi (@ProKabaddi) February 11, 2024
कोलकत्ता येथे झालेल्या या लढतीत अस्लम इनामदार च्या वेगवान चढायामुळे पुणेरी पलटण संघाने तिसऱ्याच मिनिटाला सहा गुणांची आघाडी घेतली. मोहंमद रेजा काबुद्रहांगी याने पंकज मोहितेची सुपर टॅकल करताना तमिळ संघाला पुनरागमन करून दिले. याचवेळी मोहित गोयतची बहुमोल चढाई आणि अबीनेश नडराजन याने विशाल चाहलची केलेली पकड यामुळे तमिळ संघावर पहिला लोण चढवाताना पुणेरी पलटण संघाने नवव्या मिनिटाला 12-2 अशी आघाडी मिळवली.
मोहितने दहाव्या मिनिटाला अफलातून चढाई करून पुणेरी पलटणची आगेकूच कायम राखली. अजिंक्य पवारने तमिळ संघाकडून जोरदार आक्रमण केले. मात्र त्याला पुणेरी पलटण संघाचा बचाव भेदता आला नाही. पुणेरी पलटण संघाने सलग दुसरा लोन चढवून मध्यंतराला 28-10 अशी निर्णायक आघाडी घेतली.
उत्तरार्धात मोहित गोयतने अभिषेकची पकड केली. पाठोपाठ अबीनेश याने मोहंमद रेजा याला पेचात पकडताना 27 व्या मिनिटाला तमिळ संघाचा केवळ एक खेळाडू मैदानात ठेवला. पाठोपाठ पुणेरी पलटण संघाने सलग तिसरा लोण चढवताना 41-14 अशी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. अखेरच्या काही मिनिटात तमिळ संघाने पिछाडी कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र पुणेरी पलटण संघाने आपले वर्चस्व आणि पकड कायम राखताना एकतर्फी विजयासह उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.