नवी दिल्ली –सामाजिक कार्यकर्ते संदीप पांडे यांनी प्रतिष्ठेचा रेमन मॅगसेसे पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. गाझा संघर्षातील अमेरिकी भूमिकेचा निषेध म्हणून त्यांनी संबंधित पाऊल उचलले. अमेरिकी विद्यापीठांकडून मिळालेल्या पदव्यांच्या वापसीचाही निर्णय त्यांनी घेतला.
सोशलिस्ट पार्टी(इंडिया) चे सरचिटणीस असणाऱ्या पांडे यांना २००२ यावर्षी मॅगसेसेने सन्मानित करण्यात आले होते. आता त्यांनी गाझा संघर्षात अमेरिकेने घेतलेल्या भूमिकेला विरोध दर्शवण्यासाठी पुरस्कार वापसी केली. इस्त्रायल आणि हमासमधील युद्धामुळे गाझा संघर्षाचे केंद्र बनले आहे. त्या युद्धात मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी नागरिकांची जीवितहानी झाली. त्याकडे पांडे यांनी लक्ष वेधले आहे.
अमेरिका गाझा संघर्षात इस्त्रायलला पाठिंबा देत आहे. तसेच, त्या देशाला शस्त्रविक्री करत आहे. त्यामुळे पुरस्कार कायम ठेवणे माझ्या दृष्टीने असह्य बनले आहे, अशी भावना त्यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली. काही अमेरिकी फाऊंडेशन्सचा संबंध मॅगसेसे पुरस्काराशी आहे. पांडे यांच्या निर्णयासाठी ती पार्श्वभूमी कारणीभूत ठरली आहे.