बंगळुरू – कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यावर मनीलॉंडरिंग प्रकरणात पुन्हा सीबीआयने छापे टाकले आहेत. त्यांच्या कर्नाटक, दिल्ली आणि मुंबईतील एकूण चौदा ठिकाणांवर आज छापे टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.
तथापि हा लोकांचे लक्ष अन्यत्र विचलित करण्याचा भाजपचा डाव असून कर्नाटकातील पोटनिवडणुकांच्या तयारीपासून कॉंग्रेसला हतबल करण्याचाही हा एक डाव आहे, असा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे की, बी. एस. येडियुरप्पा यांच्या भ्रष्ट कारभार झाकण्यासाठीची भाजपची ही केविलवाणी धडपड आहे.
ईडीने दिलेल्या इनपुट्सच्या आधारे सीबीआयने शिवकुमार यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या अनुषंगाने हे छापे टाकण्यात आले आहेत. गेल्या वर्षी ईडीने शिवकुमार यांची चार दिवस चौकशी करून त्यांना अटक केली होती.
शिवकुमार यांच्यावर 2017 साली छापे टाकून त्यांना 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याकडे 8.6 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे उघड झाल्याचा दावा ईडीने केला होता. नंतर ही रक्कम 11 कोटी इतकी असल्याचे सांगण्यात आले होते.
एकाच प्रकरणात आयकर विभाग आणि सीबीआय यांनी शिवकुमार यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई सुरू केली आहे. सकाळी साडेसहा वाजता ही छाप्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यात आतापर्यंत 50 लाख रुपयांची रोकड सापडल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
सीबीआयला राज्यात छाप्यासाठी अनुमती देण्याच्या येडियुरप्पा सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारा आमचा अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, असे असताना त्यांना या राज्यात येऊन छापे घालण्यास अनुमती कोणी दिली, असा सवाल शिवकुमार यांच्या वकिलांनी केला आहे. आम्हाला हे छापे नेमके कशासाठी घालण्यात आले आहेत हे कळलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.