फोंम पेन्ह – कंबोडियाने त्यांच्या देशातील अमेरिकेच्या निधीच्या आधारे सुरू असलेला नौदलाचा तळ पाडून टाकला आहे. त्या घटनेमुळे कंबोडिया आता त्या ठिकाणी चीनच्या मदतीने नवीन नौदल ठाणे उभारणार असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या; पण कंबोडियाने त्या वृत्ताचा आज अधिकृतपणे इन्कार केला आहे.
जो नौदल तळ पाडला गेला आहे, तो छोटा पडत असल्याने अन्यत्र नेण्यात आला असून तेथे तो पुन्हा नव्या स्वरूपात उभारला जाणार असून यासाठी जगातल्या ज्या देशांशी आमचा करार झाला आहे तो तसाच कायम राहील, असा खुलासा कंबोडियाने केला आहे. त्यामुळे आता आणखी एक देश चीनने आपल्या घशात घातला या बातमीला अर्थ उरला नाही, असे सांगितले जात आहे.
आम्ही जो नौदल तळ उभारला आहे त्या तळावर अमेरिका आणि चीनसह कोणत्याही देशाच्या युद्धनौका येऊ शकतील. हा केवळ चीनला एकट्याच्याच वापरासाठी आम्ही उभारलेला तळ नाही, असेही कंबोडियाने स्पष्ट केले आहे.
कंबोडिया या चीनचा चांगला राजकीय मित्र आहे, चीनकडूनही त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत येत असते. या पार्श्वभूमीवर त्यांनी अमेरिेकेच्या मदतीवर सुरू असलेला नौदलाचा तळ उद्वस्त केला, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.