हैदराबाद – वायएसआर कॉंग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जगनमोहन भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होणार का या चर्चांना उधाण आले आहे.
केंद्रातील रालोआतून गेल्याच आठवड्यात भाजपचा तीन दशकांपेक्षा जास्त काळाचा सहकारी पक्ष शिरोमणी अकाली दल बाहेर पडला आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी शिवसेना या आणखी एका मित्रपक्षाने भाजपपासून फारकत घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपलाही नव्या मित्रांची गरज असून जगन यांची भेट त्याचाच एक भाग तर नाही ना, अशा चर्चा रंगल्या आहेत.
जगन मंगळवारी सकाळी पंतप्रधानांना भेटणार आहेत. तसेच पंतप्रधानांकडून त्यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे हात बळकट करण्यासाठी आघाडीत सहभागी होण्याचे आवाहन केले जाण्याची शक्यता काही माध्यमांनी वर्तवली आहे.
जगनमोहन यांची गेल्या दोन आठवड्यांतील ही दुसरी दिल्ली वारी आहे. गेल्या आठवड्यातही त्यांनी दिल्ली दौरा केला होता. त्यावेळी ते गृहमंत्री अमित शहा यांना भेटले होते. तेव्हा प्राथमिक चर्चा झाली असावी असा कयास वर्तवण्यात आला आहे.
जगनमोहन यांच्या पक्षाचे 22 खासदार असून त्यांना एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. जगन यांचे भाजप नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असून गेल्या काही काळात त्यांनी लोकसभा तसेच राज्यसभा या दोन्ही ठिकाणी सरकारला पूरक अशीच भूमिका घेतली आहे.