मुंबई – बंगालच्या उपसागराच्या आग्नेय दिशेला असलेला कमी दाबाचा पट्टा आता तीव्र स्वरूपाचा झाला असून तो 1 डिसेंबरला पहाटे साडे पाचच्या सुमारास नैऋत्येकडे सरकला आहे. सकाळी साडे आठच्या सुमाराला तो श्रीलंकेतील त्रिंकोमालीच्या पूर्व-आग्नेय दिशेला 500 किमीवर आणि कन्याकुमारीपासून पूर्व-आग्नेय दिशेला 900 किमीवर स्थिरावला होता, असे चक्रीवादळाचा इशारा देणाऱ्या भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.
येत्या चोवीस तासांत हे चक्रीवादळ तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. ते पश्चिम-वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे, 2 तारखेच्या संध्याकाळपर्यंत ते त्रिंकोमालीजवळून पुढे जाईल. त्यानंतर 3 डिसेंबरच्या सकाळी ते आणखी पश्चिमेकडे प्रवास करून, मन्नारच्या आखातात आणि लगतच्या कोमोरीन भागात पोहोचेल आणि तामिळनाडूच्या किनारी भागाकडे सरकत जाईल.
तामिळनाडूच्या दक्षिण भागात 2आणि 3 डिसेंबरला, केरळच्या दक्षिण भागात 2,3 आणि 4 डिसेंबरला काही ठिकाणी तीव्र ते अतितीव्र स्वरूपाचा पाऊस पडेल, तर या काळात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पडेल अशी दाट शक्यता आहे.
उद्या आणि परवा उत्तर तामिळनाडू, पुदुचेरी, माहे आणि करियाकल भागात तसेच केरळच्या उत्तर भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे, या भागात 4 तारखेला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. आंध्रप्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या भागात तुरळक ठिकाणी येत्या 2 आणि 3 तारखेला तर लक्षद्वीप परिसरात 3 आणि 4 तारखेला मुसळधार पाऊस पडेल, असा इशार देण्यात आला आहे.