अहमदाबाद – भाजपचे खासदार अभय भारद्वाज यांचे मंगळवारी करोना संसर्गाने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी भारद्वाज यांना करोनाबाधा झाली. त्यांना उपचारासाठी गुजरातच्या राजकोटमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रकृती बिघडल्याने त्यांना चेन्नईतील रूग्णालयात हलवण्यात आले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रसिद्ध वकील असणारे भारद्वाज राज्यसभेत गुजरातचे प्रतिनिधित्व करत होते. चालू वर्षी जूनमध्ये ते राज्यसभा सदस्य बनले होते.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्यापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही ते त्याकाळी सक्रिय राहिले. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केले.