Cyclone Michaung : देशात मिचौंग चक्रीवादळामुळे काही राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. त्यातच तमिळनाडूमध्ये तर या चक्रीवादळाने हैदोस घातला होता. अवकाळी पावसामुळे तिथं पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, या वादळामुळे चेन्नईतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. त्यात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा मोठ्याप्रमाणात जाणवला. मात्र असे असताना आता चेन्नईतील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओत तांबरमजवळील कालव्यात अवनी दुधाची हजारो पाकिटे सापडल्याचे दिसून येत आहेत.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. अवनी दूध चेन्नईतील स्थानिक उत्पादन आहे. सापडलेल्या दुधाच्या पॅकेटवर ४ डिसेंबर अशी एक्सापायरी तारीख नोंदलेली आहे. तमिळनाडूत आलेल्या मिचौंग चक्रीवादळामुळे तेथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. अनेक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला होता. दूधाचीही कमतरता जाणवत होती. अनेकांनी दूध चढ्या भावाने विकले. त्यामुळे याच्या तक्रारीही आल्या होत्या. तर, तांबरमजवळील एका लहान कालव्यात दुधाची पाकिटे सापडली आहेत. या पाकिटांवर ४ डिसेंबर ही एक्सपायरी डेट आहे.
तमिळनाडू दूध उत्पादक सहकारी संस्था संचालकांनी स्पष्ट केले, एविन शहर आणि आसपासच्या भागात दररोज १५ लाख लिटर दूधाचे वितरण केले जाते. याशिवाय इतर जिल्ह्यातून ६,६०० किलोहून अधिक दूध पावडरचा पुरवठा केला जातो. चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या व्यत्ययामुळे दुधाचे वितरण प्रभावित झाले आहे. यामुळे अतिरिक्त पुरवठ्याची विल्वेवाट लावण्यात आली आहे. दुधाच्या पाकिटांचे योग्य वितरण न झाल्याने शहरात टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, तामिळनाडूचे दूध आणि दुग्धविकास मंत्री मनो थंगराज म्हणाले, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी खाजगी दूध पुरवठादारांना संपूर्ण दूध पुरवठा वाढवण्याचे आवाहन केले आहे.
४ डिसेंबर रोजी चक्रीवादळ मिचौंगमुळे मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता . अनेक किरकोळ दुकाने आणि सुपरमार्केट ४ डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात आले होते आणि ज्या विक्रेत्यांना त्यांच्या ताब्यातील दुधाची पाकिटे विकता आली नाहीत त्यांनी ती कालव्यात टाकली असण्याची शक्यता होती, असंही पालिकेने एका निवेदनात म्हटलं आहे.