बर्मिंगहॅम – भारताचा अनुभवी पॅरा पॉवरलिफ्टर सुधीर याने येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पॅरा विभागात इतिहास रचला. त्याने आपल्या गटात 212 किलो वजन उचलत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या पॅरा स्पर्धेत भारताने प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे. सुधीरला कळत्या वयातच पोलिओने ग्रासले होते. मात्र, तरीही त्याने जिद्द सोडली नाही व आज इतकी मोठी कामगिरी केली. पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारा सुधीर भारताचा पहिलाच खेळाडू बनला आहे.
सुधीरने पहिला प्रयत्न फाऊल ठरल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 134.5 अशा गुणांसह 212 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. सुधीरला अखेरच्या प्रयत्नात 217 किलो वजन उचलण्यात अपयश आले. मात्र, त्यानंतरही हार न मानता त्याने अन्य स्पर्धकांपेक्षा जास्त वजन उचलत सुवर्णपदकाची कमाई केली. नायजेरियाच्या इकेचुकवू क्रिस्टियन उबिचुकवू याने 133.6 गुणांसह रजतपदक, तर स्कॉटलंडच्या मिकी युलने 130.9 गुणांसह ब्रॉंझपदक जिंकले.
सुधीरने यापूर्वी तब्बल सात वेळा राष्ट्रीय विजेता बनण्याची कामगिरी केली आहे. तसेच स्ट्रॉंगमॅन ऑफ इंडिया हा किताबही त्याने दोन वेळा पटकावला आहे. हरियाणातील सोनीपत येथील लाठ गावात शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओमुळे तो अपंग झाला. मात्र, सुधीरने हार मानली नाही. 2013 साली त्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी पॉवरलिफ्टिंग या खेळाचे धडे गिरवायला प्रारंभ केला.
And The Champion Creates History!!!#Sudhir wins India’s first ever Gold medal in Para-Powerlifting at #CommonwealthGames2022.
Congratulations Champion!
Keep on Winning!#CWG2022India #CWG2022 #Cheer4India#TeamIndia pic.twitter.com/sWUEGvt00b
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 5, 2022
भारताचाच पॅरा खेळाडू वीरेंद्र धनखड याच्याकडून प्रेरणा घेत सुधीरने पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सहभाग घेणे सुरू केले. केवळ दोन वर्षांतच तो राष्ट्रीय स्तरावर नावाजला जाऊ लागला व राष्ट्रीय खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकत त्याने आपली गुणवत्ताही सिद्ध केली. सुधीर गेल्या सात वर्षांपासून पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकत आहे.