हैदराबाद :- फलंदाजांच्या कामगिरीनंतर गोलंदाजांनीही दिलेल्या योगदानाच्या जोरावर पाकिस्तानने एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत नेदरलॅंड्सचा 81 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 287 धावांच्या आव्हनाचा पाठलाग करताना नेदरलॅंडच्या प्रमुख फलंदाजांनी साफ निराशा केली. मात्र, सलामीवीर विक्रमजीत सिंगने 58 तर बास दी लीडेने 67 धावांची खेळी करत लढत दिली. मात्र, हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यावर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी ठरावीक अंतराने बळी मिळवत विजय साकार केला. तळात लोगन वॅन विकने नाबाद 28 धावांची खेळी करत चमक दाखवली मात्र, तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. नेदरलॅंड्सचा डाव 205 धावांवर संपूष्टात आला. पाकिस्तानकडून हॅरिस रौफने सर्वाधिक 3 गडी बाद केले. हसन अलीने 2 बळी घेतले.
Dominant showing in our first #CWC23 outing 👏
All the bowlers chipped in to put up a clinical performance 🙌#PAKvNED | #DattKePakistani | #WeHaveWeWill pic.twitter.com/2YEOcuhMfX
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 6, 2023
तत्पूर्वी, महंमद रिझवान व सौद सखिल यांची अर्धशतके तसेच अन्य फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने शुक्रवारी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत नेदरलॅंडसमोर विजयासाठी 287 धावा करण्याचे आव्हान ठेवले. नेदरलँड्सविरुद्ध पाकिस्तानचा संघ 49 षटकांत 286 धावांवर ऑलआऊट झाला.
नाणेफेक जिंकल्यावर नेदरलॅंडचा कर्णधार स्कॉट एडवर्डसने पाकिस्तानला पहिल्यांदा फलंदाजी दिली. पाकिस्तानच्या डावाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. सलामीवीर फखर झमान, कर्णधार बाबर आझम व इमाम उल हक यांनी साफ निराशा केली. यावेळी त्यांची स्थिती 3 बाद 38 अशी बिकट बनली होती. त्यानंतर महंमद रिझवानने सौद शकिलच्या साथीत अफलातून फलंदाजी केली व संघाचा डाव सावरला. या दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण करताना संघाचे दीडशतक फलकावर लावले.
शकिल 52 चेंडूत 9 चौकार व 1 षटकारासह 68 धावांवर बाद झाला. पाठोपाठ रिझवानही 68 धावांवरच बाद झाला. त्याने 75 चेंडूत 8 चौकार फटकावले. ही जोडी परतल्यावर पुन्हा एकदा संघाची गाडी घसरली. ईफ्तेखार अहमद व हसन अली यांनीही साफ निराशा केली. तळात महंमद नवाज व शादाब खान यांनी उपयुक्त फलंदाजी करत संघाला द्विशतकी पल्ला पार करून दिला.
नवाज 43 चेंडूत 4 चौकारांसह 39 धावांवर धावबाद झाला. शादाबही 34 चेंडूत 2 चौकार व 1 षटकारासह 32 धावांवर परतला. त्यानंतर हॅरीस रौफ व शाहीन शाह आफ्रीदी यांनी थोडीफार चुणुक दाखवली व संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. नेदरलॅंडकडून बास दी लीडेने सर्वाधिक 4 गडी बाद केले. कॉलिन ऍकरमनने 2 बळी घेतले. तर आर्यन दत्त, लोगन व्हॅन बीक आणि पॉल व्हॅन मीकरेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक :-
पाकिस्तान – 49 षटकांत सर्वबाद 286 धावा. (महंमद रिझवान 69, सौद शकिल 68, महंमद नवाज 39, शादाब खान 32, बास दी लीडे 4-62, कॉलिन ऍकरमन 2-39).
नेदरलॅंड्स – 41 षटकांत सर्वबाद 205 धावा. (बास दी लीडे 67, विक्रमजीत सिंग 58, लोगन वॅन विक नाबाद 28, हॅरिस रौफ 3-43, हसन अली 2-33).