World Cup 2023 IND vs BAN : ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात बांगलादेशशी भिडणार आहे. सलग तीन विजयानंतर रोहित सेनेचे मनोबल उंचावले आहे. त्याचवेळी बांगलादेश संघाला दोन पराभवानंतर भारताविरुद्ध (Team India) आपला दमदार खेळ दाखवण्याचे आव्हान आहे.
विश्वचषक 2023 च्या मोहिमेतील विराट कोहलीची कामगिरी कौतुकास्पद आहे. विराटने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. विराटने अनेक मोठ्या मैदानांवर धावा केल्या आहेत. धावा करण्याच्या बाबतीत विराट पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचा किंग मानला जातो. या मैदानावर धावा करण्यासोबतच विराटने इतर अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. याच मैदानावर उद्या(19 ऑक्टोबर) भारताचा चौथा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे.
पुण्याच्या मैदानावरील विराटच्या विक्रमाबद्दल जाणून घेऊया…..
भारतीय संघाने 2013 पासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सात एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये भारताने चार सामने जिंकले आहेत. या मैदानावर भारताचा सर्वोत्तम विजय इंग्लंडविरुद्ध होता. मार्च 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या हाई-स्कोअरिंग सामन्यात भारताने इंग्लंडचा 66 धावांनी पराभव केला. हा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा भाग होता. भारताने ही मालिका 2-1 ने जिंकली होती.
या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या विराटच्या नावावर…
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर विराटने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात विराटने 147 मिनिटे फलंदाजी केली आणि 105 चेंडूत पाच षटकार आणि आठ चौकारांच्या मदतीने 122 धावा केल्या. या मैदानाची ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्या सामन्यात केदार जाधवनेही 120 धावांची खेळी केली होती. केदारने 76 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकार मारले होते. त्याने विराटसोबत 200 धावांची भागीदारी केली होती.
मैदानावर सर्वाधिक शतकेही विराटचीच…
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या मैदानावर विराट कोहलीनेच सर्वाधिक शतकेही झळकावली आहेत. पुण्यातील या मैदानावर विराटने सात डावांत सर्वाधिक 448 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 37 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश आहे. या मैदानावर विराटने एकूण 2 शतके झळकावली आहेत. पुण्यातील या मैदानावर विराटची फलंदाजीची सरासरी 66.00 आहे, याशिवाय त्याचा स्ट्राईक रेट 91.99 आहे. त्याने दोन डावात अर्धशतकेही झळकावली आहेत.
कोहलीशिवाय केएल राहुल याने या मैदानावर एक शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने 185 धावा चोपल्या आहेत. हार्दिक पांड्याने 5 सामन्यात 170 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने येथे 147 धावा केल्या आहेत.
गोलंदाजीत जसप्रीत बुमराहचा जलवा…
पुण्याच्या एमसीए मैदानावर भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. भुवनेश्वर कुमारने सहा डावात 10 विकेट घेतल्या आहेत. पण सध्याच्या विश्वचषकासाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. दुसऱ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराहचा क्रमांक लागतो. बुमराहने तीन डावात 8 विकेट घेतल्या आहेत. 35 धावांच्या मोबदल्यात चार विकेट, बुमराहची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. शार्दूल ठाकूरने तीन सामन्यात सात विकेट घेतल्या आहेत.
सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम भारताच्या नावावर…
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारताने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम नोंदवला आहे. या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारताला 351 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. भारताने 48.1 षटकात 7 विकेट गमावून 356 धावा करत सामना जिंकला. या मैदानाची ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. या वनडे सामन्यात विराट कोहली आणि केदार जाधव यांनी शानदार शतकी खेळी खेळली. दोन्ही फलंदाजांमध्ये 200 धावांची भागीदारी झाली होती.