ICC ODI World Cup 2023 Australia vs Netherlands Match update : आज, विश्वचषक 2023 च्या 24 व्या सामन्यात, पाच वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा सामना नेदरलँड्सशी होत आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत आठ गडी बाद 399 धावा केल्या. नेदरलँड्सला विजयासाठी 400 धावांचे कठीण लक्ष्य मिळाले आहे.
ऑस्ट्रेलियाचा झंझावाती फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने विश्वचषकात इतिहास रचला. त्याने बुधवारी (२५ ऑक्टोबर) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नेदरलँड्सविरुद्ध 40 चेंडूत शतक झळकावले. विश्वचषकाच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान शतक आहे. मॅक्सवेलने दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमचा विक्रम मोडला. योगायोग म्हणजे याच विश्वचषकात मार्करमने हा विक्रम केला आहे. मॅक्सवेलने त्याला अवघ्या 19 दिवसांत मागे टाकलं आहे.
मॅक्सवेलने विश्वचषकातील सर्वात जलद शतक झळकावले पण…
मॅक्सवेलने विश्वचषकातील सर्वात जलद शतक झळकावले पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो या बाबतीत पहिला येऊ शकला नाही. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील चौथे जलद शतक झळकावले. या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स पहिल्या स्थानावर आहे. त्याने 2015 मध्ये जोहान्सबर्ग येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 31 चेंडूत शतक झळकावले होते. 2014 मध्ये न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनने क्वीन्सटाउनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 36 चेंडूत शतक झळकावले आणि 1996 मध्ये नैरोबीमध्ये श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने 37 चेंडूत शतक झळकावले आहे.
केवळ चौकार आणि षटकारांसह 84 धावा…
मॅक्सवेलने नेदरलँड्स विरूध्द शेवटच्या षटकांमध्ये तुफानी खेळी खेळली आणि अवघ्या 40 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विश्वचषकात सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा तो खेळाडू ठरला. मॅक्सवेलने या सामन्यात 44 चेंडूत 106 धावा केल्या. यादरम्यान मॅक्सवेलने 9 चौकार आणि 8 षटकार ठोकले. म्हणजेच मॅक्सवेलने केवळ चौकार आणि षटकारांसह 84 धावा केल्या. स्फोटक पद्धतीने खेळणाऱ्या कांगारू फलंदाजाने अवघ्या 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर मॅक्सवेलने खऱ्या अर्थाने आपली ताकद दाखवून दिली आणि पुढच्या 13 चेंडूत पुढचे अर्धशतक झळकावले.
विश्वचषकातील सर्वात जलद शतक…
40 चेंडू – ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया वि नेदरलँड्स, दिल्ली 2023)
49 चेंडू – एडन मार्कराम (द.आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, दिल्ली 2023)
50 चेंडू- केविन ओ’ब्रायन (आयर्लंड वि इंग्लंड, बेंगळुरू 2011)
51 चेंडू- ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, सिडनी 2015)
52 चेंडू – एबी डिव्हिलियर्स (द.आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, सिडनी 2015)
ग्लेन मॅक्सवेलने वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याच्या बाबतीत अॅडम मार्करामला मागे टाकले आहे. मार्करामने या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध खेळताना 49 चेंडूत शतक झळकावले होते. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर केविन ओब्रायनचे नाव आहे, ज्याने 50 चेंडूत ही कामगिरी केली. त्याचबरोबर मॅक्सवेलने 2015 च्या विश्वचषकात 51 चेंडूत शतक झळकावले होते.