पुणे : ससून रुग्णालयातील सीटीस्कॅन आणि एमआरआय हे मशीनच सध्या अक्षरश: व्हेंटिलेटरवर गेले असून, ते वारंवार बंद पडत असल्याने रुग्णाची गैरसोय होत आहे. त्याला सारखे दुरुस्त करावे लागत असून, किती वेळा त्याची दुरुस्ती केली याची गणती करणेच आता ससून प्रशासनाने सोडून दिले आहे.
शरीरांतर्गत जखम, हाडांची झीज, रक्तस्त्राव, फुफ्फुस, विविध गाठी, अपघात यासारख्या बऱ्याच गोष्टींमध्ये विविध अवयवांचे सीटीस्कॅन, एमआरआय आदी तपासण्या करण्यात येतात. या तपासण्या अत्यल्प दरात ससूनमध्ये केल्या जातात. दर अल्प असतातच पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्याचा अहवाल लगेचच संबंधित विभागात, संबंधित डॉक्टरांकडे अपलोड केला जातो. परंतु, हे तपासणी मशीनच बंद पडत असल्याने रुग्णांना वाट पाहून निघून जावे लागत आहे. हा वाट पाहण्याचा कालावधी अनेक तासांचा आहे. त्यामुळे वैतागून खासगी ठिकाणी हजारो रुपये खर्चून या चाचण्या रुग्णांना करून घ्याव्या लागत आहेत. आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या रुग्णाला खासगीमध्ये जाऊन तपासणी करणे परवडणारे नाही. ससूनमध्ये दररोज बरेच सिटीस्कॅन आणि एमआरआय होतात. त्यामुळे मशीन गरम होते. वातानुकुलित यंत्रणा चांगल्या स्थितीत नसल्याने हे मशीन गरम होतात त्यामुळे हे सतत बिघडत असते.
एमआरआय आणि सीटीस्कॅन मशीन बंद पडतात ही वस्तुस्थिती आहे. त्या जुन्या झाल्या असल्यानेच हा प्रकार होत आहे. त्यावर प्रचंड लोड असतो, दिवसभरात बरेच काम त्यावर होते. ते मशीन गरम होते आणि बंद पडते. शेवटी तेही मशीन आहे. मात्र नव्या मशीन्सची मागणी केली असून, तसा प्रस्तावही “हाफकीन’कडे पाठवला आहे. अंतीम मंजुरी अद्याप बाकी आहे, ती मिळाल्यानंतर नव्या मशीन्स येतील.
– डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय