पुणे – ससून रुग्णालय प्रशासन आणि पोलीस दलाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झाडाझडती घेतली. यानंतर ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षकाकडून काढून घेण्यात आला आहे. आता हे प्रकरण गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस आयुक्तांकडे सोपवले जात आहे.
याप्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दररोज नवीन ट्विस्ट येत आहे. हा तपास अंमली पदार्थ विरोधी पोलीस निरीक्षकांमार्फत सुरू होता. पण, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता हा निर्णय घेतला जात आहे. ससून रुग्णालयातून ललित पाटील ड्रग रॅकेट चालवत होता. याप्रकरणी ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांवर अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार (एनडीपीएस) बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास आतापर्यंत अमली पदार्थ विरोधी पथकच करत होते.
मात्र, आता याचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुलील तांबे यांच्याकडे देण्यात येत आहे. तर ललित पाटील याने ससून रुग्णालयातून एक्स-रेसाठी जाताना, पोलिसांच्या ताब्यातून पळ काढला होता. या पलायनप्रकरणी दुसरा एक गुन्हा बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्याचाही तपास आता गुन्हे शाखा युनिट-दोनकडे देण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांत पाच जणांना अटक करण्यात आली.
ललित पाटील फरार आहे. भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना उत्तप्रदेशातून, तर ड्रायव्हर दत्ता डोके याला हडपसर परिसरातून पकडले. त्यानेच ललिलला रावेतपर्यंत गाडीतून सोडले. अभिषेक याच्या नाशिक येथील घरातून पुढे पोलिसांनी तीन किलो सोने जप्त केले.
भूषण पाटील सहकार्य करेना
भूषण पाटील पोलिसांना तपासात सहकार्य करत नाही. त्याच्याकडून ललित पाटीलसंदर्भात कोणतीही माहिती मिळत नाही. यामुळे ललितचा ठावठिकाणा अद्याप लागला नाही. दहा पथकांच्या हाती ललित संदर्भात अद्याप ठोस काही लागले नाही.