#IPL2021 : चेन्नईने सोपा सामना अवघड करून जिंकला

अबुधाबी – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील दुसऱ्या पर्वातील रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा 2 गडी राखून पराभव केला. एकवेळ सोपा वाटणारा विजय चेन्नईने अवघड केला होता.

विजयासाठी 172 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईने खरेतर धडाक्‍यात प्रारंभ केला होता. त्यावेळी हा सामना ते सहज जिंकतील अशी स्थिती होती. मात्र, प्रमुख फलंदाजांनी बेजबाबदार फलंदाजी केल्याने त्यांच्यासमोर पराभव स्पष्ट दिसू लागला होता. अखेर रवींद्र जडेजाने अफलातून खेळी करत सामना जिंकून दिला.

विजयासाठी 172 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईने आश्‍वासक प्रारंभ केला होता. ऋतुराज गायकवाड व फाफ डुप्लेसी यांनी संघाला 71 धावांची सलामी दिली. गायकवाड 28 चेंडूत 2 चौकार व 3 षटकार फटकावून 40 धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर संघाचे शतक फलकावर लावल्यावर डुप्लेसीदेखील 30 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 43 धावांवर बाद झाला. मोईन अलीने 28 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार अशी फटकेबाजी करत 32 धावांची खेळी केली. आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात मात्र तो बाद झाला.

यावेळी चेन्नईची स्थिती 4 बाद 138 अशी झाली होती. त्यानंतर अम्बाती रायडू, सुरेश रैना, कर्णधार महेंद्रसिंह धोनी व सॅम कुरेन यांनी साफ निराशा केल्याने त्यांचा पराभव दिसू लागला होता. त्याचवेळी जडेजाने अफलातून फलंदाजी करत सामना खेचून आणला. त्याने 8 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार फटकावताना 22 धावांची खेळी केली. 19 व्या षटकात सामन्याला कलाटणी मिळाली.

जडेजाने ही आतषबाजी करताना सामना सोपा केला होता. मात्र, जडेजा बाद झाल्यावर पुन्हा एकदा पराभवाचे सावट निर्माण झाले होते. अखेर शार्दूल ठाकूर व दीपक चहर यांनी संयमी खेळ केला. चहरनेच एका चेंडूत 1 धाव हवी असताना कव्हरला चेंडू तटवला व संघाचा विजय साकार केला. कोलकाताकडून सुनील नरेनने सर्वाधिक 3 गडी बाद केले.

कोलकात्याचा कर्णधार मॉर्गननं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 171 धावा केल्या होत्या. कोलकाताचा सलामीवीर शुभमन गिल पहिल्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर धावचीत झाला. अंबाती रायडूने अफलातून क्षेत्ररक्षण करत गिलला बाद केले. त्यानंतर यंदाच्या स्पर्धेतील स्टार वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांनी संघाचा डाव सावरला. संघाचे अर्धशतक फलकावर लागले तेव्हा अय्यर 3 चौकारांसह 15 चेंडूत 18 धावा करून परतला. कर्णधार इयॉन मॉर्गनही 14 चेंडूत 8 धावा करून बाद झाला.

खेळपट्टीवर स्थिरावलेला राहुल त्रिपाठीही 33 चेंडूत 45 धावा काढून तंबूत परतला. अष्टपैलू आंद्रे रसेलनेही निराशा केली. त्याने 15 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावताना 20 धावा केल्या. त्यानंतर माजी कर्णधार दिनेश कार्तिक आणि नितीश राणा या जोडीने आक्रमक फलंदाजी करत संघाला यंदाच्या स्पर्धेतील मोठी धावसंख्या उभारून दिली. कार्तिक 11 चेंडूत 3 चौकार व 1 षटकार मारून 26 धावांवर बाद झाला.

चेन्नई आणि कोलकाता दरम्यान आतापर्यंत 23 सामने झाले आहेत. त्यापैकी 15 सामन्यांत चेन्नईने, तर 8 सामन्यांत कोलकात्याने विजय मिळवला आहे. अबुधाबीत या दोन्ही संघात एक सामना खेळला गेला होता. यात कोलकात्याने बाजी मारली होती. चेन्नई सुपर किंग्ज संघात एक बदल करण्यात आला. सॅम कुरेनला संघात स्थान देण्यात आले आहे, तर कोलकाताने आपला विजयी संघच कायम ठेवला.

संक्षिप्त धावफलक – कोलकाता नाईट रायडर्स – 20 षटकांत 6 बाद 171 धावा. (राहुल त्रिपाठी 45, नितीश राणा 37, दिनेश कार्तिक 26, आंद्रे रसेल 20, शार्दूल ठाकूर 2-20, जोश हेझलवूड 2-40). चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 8 बाद 176 धावा. (फाफ डुप्लेसी 43, ऋतुराज गायकवाड 40, मोईन अली 32, रवींद्र जडेजा 22, शार्दूल ठाकूर नाबाद 3, दीपक चहर नाबाद 1, सुनील नरेन 3-41).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.