मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री. नवाब मलिक यांनी “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त” म्हणत एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावरील हल्लाबोल कायम ठेवला आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती माध्यमांसमोर मांडली. तसेच क्रुजवरील व्हिडीओ शेअर करत मलिक यांनी आधी उल्लेख केलेल्या दाढीवाल्या व्यक्तीचं सत्य समोर आणल आहे.
नवाब मलिक म्हणाले की, वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचा फोटो मला रात्री दोन वाजता मिळाला. ज्यांनी फोटो दिला त्यांनी माझ्याकडून हा फोटो माध्यमांपुढे यावा, अशी इच्छा व्यक्त केली. ही लढाई कोणाच्या धर्माशी अथवा परिवाराशी नसून ही लढाई अन्यायाविरोधातील आहे, हे मलिक यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आजही मुंबई शहरात शंभरहून अधिक निरपराध लोक तुरुंगात आहेत. त्यांना खोट्या आरोपात अटक झाली आहे. यासंदर्भात 26 प्रकरणांचे पत्रक एनसीबीच्या डिजींना दिले असता याची चौकशी होईल असे सांगण्यात आले, मात्र कायद्यानुसार सादर केलेल्या माहितीमध्ये कोणाचे नाव नसल्याने या प्रकरणाची दखल घेण्यात आली नाही. तरीही या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.
या २६ प्रकरणातील २२ क्रमांकाच्या प्रकरणात एका नायजेरीयन नागरिकाला खोट्या आरोपात अडकविण्यात आले. या कारवाईतील पंच कांबळे यांनी याची कबुली दिली आहे. त्यामुळे मी दिलेल्या पत्राच्या माध्यमातून या 26 प्रकरणांची चौकशी बंद न करण्याची मागणी एनसीबीच्या डिजींकडे करणार असल्याचे ते म्हणाले.
Video of Kashif khan dancing on the Cruise ship pic.twitter.com/JoSsYF9Ux1
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 29, 2021
काशिफ खान आणि वानखेडे यांचे नाते काय?
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील दाढीवाल्या व्यक्तीवर मलिक यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्याची माहितीही त्यांनी दिली. त्या व्यक्तीचे नाव काशिफ खान असे असून हा मोठा ड्रग पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी केला. शिवाय हा व्यक्ती अवैध सेक्स रॅकेट, पॉर्नोग्राफी चालवत असल्याचे ते म्हणाले. काशिफ खान हा समीर वानखेडेचा चांगला मित्र आहे. अनेक अधिकाऱ्यांनी काशिफ खानवर कारवाईचा प्रयत्न केला असता त्यांना रोखण्याचे काम वानखेडे यांनी केल्याचे समोर आले आहे.